इंदापूर(प्रतिनिधी-अशोक घोडके): केंद्राची हर घर जल या योजनेंतर्गत प्रत्येक घरात नळाद्वारे शुद्ध पिण्याचे पाणी देण्याचा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प असल्याचे प्रतिपादन केंद्रीय जलशक्ती विभागाचे राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी केले.
उद्धट प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेच्या रु. 102 कोटी रुपये खर्चाच्या कामाची भूमिपूजन प्रल्हादसिंह पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे होते. याप्रसंगी केंद्रीय मंत्री पटेल बोलत होते. यावेळी भाजपाचे राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य संजय टंडन, आ. राम शिंदे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, बाळासाहेब गावडे, रंजन तावरे, दिलीप खैरे, अविनाश मोटे, वासुदेव काळे, जालिंदर कामठे, अंकिता पाटील ठाकरे, राजवर्धन पाटील, करणसिंह घोलप, लालासाहेब पवार, अँड.शरद जामदार यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्री.पटेल पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसर्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर देशातील जनतेला शुद्ध पिण्याचे पाणी पुरवठ्यासाठी तब्बल एक लाख कोटी निधी असणारा जल जीवन मिशनचा कार्यक्रम हाती घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा महत्त्वकांक्षी कार्यक्रम असून, देशात डिसेंबर 24 पर्यंत प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी देण्याचा त्यांचा संकल्प आहे. या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागासाठी प्रति मानसी 55 लि. पाणी दिले जाणार आहे. या योजनेसाठी जलस्त्रोत हा 30 वर्ष टिकणारा असेल तरच तो स्थायी स्वरूपाचा ग्राह्य धरावा, तसे असेल तरच योजना करावी असा केंद्र शासनाचा आदेश आहे. योजनेचा डीपीआर ग्रामपंचायतीला दिला पाहिजे. योजनेचा डीपीआर बनवताना जनतेला ग्रामपंचायतीने विश्वासात घेतले पाहिजे. या योजनेचा दुरुपयोग होता कामा नये. हर घर जल योजनांच्या पाण्याच्या जलस्त्रोत संदर्भात अधिकार्यांना 20 दिवसात अहवाल देण्याचे आदेश मी आता दिले आहेत.
जल जीवन मिशन च्या सर्व योजनांसाठी केंद्र सरकारने थर्ड पार्टी प्रमाणपत्र तपासणी अहवाल आल्याशिवाय योजना पूर्ण झाले असे समजले जाणार नाही, नियमबाह्य पद्धतीने होणार्या योजनांच्या कामाची चौकशी होईल, असा इशारा या खात्याचे मंत्री असलेले ना.पटेल यांनी दिला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, इंदापूर येथे हर घर जल या योजनेंतर्गत सुरू असलेल्या कामावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्राचे टास्क फोर्स ची नियुक्ती करण्यात यावी. कारण कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार झाल्या नाहीत, तर त्याची झळ 30 वर्षे जनतेला सहन करावी लागेल व अनेक ठिकाणी जनतेला पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागेल. त्यामुळे संबंधित अधिकारी वर्गाने जबाबदारीने योजना कार्यान्वित कराव्यात, त्यात कोणताही गैरव्यवहार होऊ देऊ नये. चुकीची कामे देखील होता कामा नयेत. अन्यथा त्यांच्यावर सरकारकडून फौजदारी दाखल होईल असेही पाटील यांनी सांगितले. इंदापूर तालुक्याला 725 कोटी रुपये हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या माध्यमातून केंद्रीय राज्यमंत्री पटेल यांनी दिले आहेत. इंदापूर तालुक्यातील रस्त्यांची कामे ज्या पद्धतीने झाली आहेत, पुढे डांबर टाकले जाते व मागे तेच डांबर हाताने उचकटते अशा पद्धतीची कामे सध्या तालुक्यात सुरू आहेत. अशी कामे जल जीवन मिशन मध्ये होता कामा नयेत. कारण जल जीवन मिशन ही जनतेच्या आरोग्याशी निगडित असल्याने जलजीवन मशीनची कामे गुणवत्तापूर्ण होतील याची सर्वांनी काळजी घ्यावी, असेही ते म्हणाले.
यावेळी तानाजीराव थोरात, सरपंच रवींद्र यादव यांनी मनोगत व्यक्त केले. तर जल जीवन मिशनच्या दोन अधिकार्यांनी योजनेची माहिती दिली. कार्यक्रमास मारुती वनवे, विलासराव माने, देवराज जाधव, वसंत मोहोळकर, उदयसिंह पाटील, मयूरसिंह पाटील, संग्रामसिंह निंबाळकर, कुमार गायकवाड, नितीन माने, पिंटू काळे, लालासाहेब सपकळ, विजय पांढरे, बालाजी घोलप यांचेसह तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी, गावोगावचे सरपंच, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार धर्मेश थोरात यांनी मानले.