कर्जत: आर्थिक स्थैर्य प्राप्त करायचे असेल तर प्रत्येक व्यक्तीकडे व्यावसायिक कौशल्य असले पाहिजे यातून अनेक व्यक्तींना स्वतःचा व्यवसाय सुरू करता येतो किंवा खाजगी सेवा देता येते असे मत आ.रोहित पवार यांनी व्यक्त केले.
आ. पवार पुढे बोलताना म्हणाले की, कर्जत जामखेड मतदारसंघातील गरजूंना उपजीविकेचे माध्यम तयार होण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न म्हणून कर्जत जामखेड एकात्मिक संस्था तसेच केंद्र शासन पुरस्कृत जनशिक्षण संस्था,अहमदनगर यांच्यासोबत माझी आई सुनंदाताई पवार यांनी विश्वस्त म्हणून कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमासाठी सामंजस्य करार केला. या करारामुळे माझ्या मतदारसंघातील निरक्षर,बेरोजगार, अल्पशिक्षित, वंचित घटक, विधवा, परित्यक्ता महिला व इतर अनेक घटकांना अगदी नाममात्र शुल्क आकारून तसेच अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील लोकांना मोफत वेल्डींग,वायरमन,घरगुती उपकरणांची दुरुस्ती,भरतकाम, शिवणकाम, आदी प्रकारचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
येत्या काळात नर्सरी,फॅशन ज्वेलरी,अगरबत्ती मेकिंग, डेटा एन्ट्री, सुरक्षा रक्षक, पेडीक्योर आणि मेनीक्योर,हेअर स्टाईल,सहायक ब्युटीशीयन, आदी विषयांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यावेळी त्यांनी जनशिक्षण संस्थेचे या कार्यक्रमासाठी आभार मानले.