बारामतीः “जर कोणत्याही हिंदूला वाटत असेल की भारतात एकही मुस्लीम नको, तर तो हिंदू नसेल.” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी शनिवारी न्यूयॉर्कमध्ये ‘वन वर्ल्ड, वन ह्युमॅनिटी’ या धर्मगुरूंच्या परिषदेला संबोधित केले.
या परिषदेत बोलत असताना त्यांनी 2018 साली मुस्लीम समुदायाच्या सदस्यांबरोबर झालेल्या एका संभाषणाची आठवण सांगितली. हिंदू राष्ट्राच्या कल्पनेत मुस्लिमांना वगळण्यात आलेले नाही, असे सांगताना ते म्हणाले, “जर कोणत्याही हिंदूला वाटत असेल की भारतात एकही मुस्लीम नको, तर तो हिंदू नसेल.”
“जर एखाद्या हिंदूला वाटत असेल की, भारतात एकही मुस्लीम नको. तर तो स्वतः हिंदू नसेल. जर तुम्ही हिंदू असाल तर तुमचा विश्वास असला पाहिजे की, सर्व मार्ग एकाच ध्येयाकडे जातात आणि प्रत्येक माणसाला प्रतिष्ठा आहे. तुमच्यात आणि त्यांच्यात कोणताही भेद नाही”, असेही मोहन भागवत पुढे म्हणाले.
सरसंघचालक मोहन भागवत पुढे म्हणाले, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणून आमचा विश्वास आहे की, संपूर्ण मानवजात एक आहे. आपल्यात वरवर दिसणारी विविधता असली तरी आपण एक आहोत. हा संदेश जगात जाऊन पोहोचवणे, हे आपले कर्तव्य आहे. विविधता हे आपल्या एकतेचे प्रतीक असून त्याचा स्वीकार, आदर आणि जतन केले पाहिजे.”
सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले, “मी धर्मगुरू नाही किंवा तुमच्यासारखा (इतर धर्मगुरूंना उद्देशून) धार्मिक विद्वान नाही. पण मी अशा समाजात काम करतो, जिथे असे मानले जाते की, धर्म वेगवेगळे असले तरी मानवता एक आहे. सत्य एकच आहे आणि मानवता हे सत्याचेच फळ आहे. त्यामुळे मानवताही एकच आहे. पण त्याचे वर्णन वेगवेगळ्या पद्धतीने केले जाते. कारण मानवाच्या डोक्यात जे सॉफ्टवेअर बसले आहे, त्याचे सर्व कैदी आहेत.”
धर्माची ओळख प्रामुख्याने त्यांच्या विधीवरून होते. धर्माचे विधी आणि धार्मिक शिस्त वेगवेगळी असली तरी त्यांचा उद्देश एकच असतो, तो म्हणजे सत्याचा शोध, असेही मोहन भागवत म्हणाले.
भारताच्या धार्मिक इतिहासाबाबत बोलताना मोहन भागवत म्हणाले, “भारताने इतिहासात अनेक धर्माच्या आणि पंथाच्या लोकांना आश्रय दिला आहे. आपला समाज आणि आपला देश परकीय आक्रमणांचे लक्ष्य बनला आणि अनेक गोष्टी गमावल्या गेल्या. पण परंपरा मात्र कायम आहे. ती सामान्य माणसाला एक गोष्ट शिकवते, ती म्हणजे एक जग, एक मानवता.”