बारामती(प्रतिनिधी): महाविद्यालयीन परिसरात विद्यार्थिनींना सुरक्षित व निर्भय वातावरण मिळावे. छेडछाडीच्या प्रकारांना प्रतिबंध व्हावा तसेच महाविद्यालय परिसरात वेगाने, बेदरकारपणे व वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करून वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांवर प्रभावी नियंत्रण निर्माण व्हावे, या उद्देशाने अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांच्या आदेशानुसार व उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती वाहतूक शाखेकडून विशेष धडक कारवाई करण्यात आली.
श्री.कदम यांनी दिलेल्या सूचनेनुसार वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक महेश स्वामी यांच्या नेतृत्वाखाली आज तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय परिसरात वाहतुक शाखेकडून अचानक नाकाबंदी करून धडक कारवाई करण्यात आली.
सदर कारवाईत बारामती वाहतूक शाखेचे 19 पोलीस अंमलदार तसेच 1 आर.सी.पी. पथक सहभागी झाले होते. या दरम्यान वाहनचालकांची कसून तपासणीत एकूण 78 केसेस करून 59 हजार दंडाची कारवाई करण्यात आली.
कोणती कारवाई, किती केसेस व कंसात दंडाची रक्कम पुढीलप्रमाणे नो पार्किंग-3 (2 हजार 500), ट्रिपल सीट-1(1 हजार), लायसन्स नसणे-2 (10 हजार), लायसन्स जवळ न बाळगणे-36 (20 हजार), नंबर प्लेट ब्रोकन-21(13 हजार), मोबाईल संभाषण करत वाहन चालविणे-1(1 हजार), काळी काच-3 (3 हजार 500), पोलीस इशारा-1 (1 हजार 500), विदाउट एच.एस.आर.पी.-1(500), वाहनात बदल करणे-1 (1 हजार), इतर केसेस-8(5 हजार) याशिवाय नो-एन्ट्री, नो-सीटबेल्ट, विदाउट हेल्मेट, विदाउट इन्शुरन्स, विदाउट क्लिनर, विदाउट रेड रिफ्लेक्टर, अवैध प्रवासी वाहतूक तसेच मोटार वाहन कायदा कलम 185 या बाबींचीही तपासणी करण्यात आली. विशेष म्हणजे, अल्पवयीन मुले-मुली वाहन चालवत असल्याबाबत 13 स्वतंत्र कारवाया करण्यात आल्या. अशा प्रकारच्या अचानक नाकाबंदी मोहिमा यापुढेही राबविण्यात येणार आहेत.
महाविद्यालय सुरू व सुटण्याच्या वेळेत विनाकारण वाहने फिरविणे, विद्यार्थिनींचा पाठलाग करणे, छेडछाडीला कारणीभूत ठरणारे वर्तन करणे, मोठ्या आवाजात अथवा बेदरकारपणे वाहन चालविणे, ट्रिपल सीट वाहन चालविणे किंवा महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर वाहतूक अडथळा निर्माण करणे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी विशेष प्रतिबंधात्मक पोलिसिंगवर भर देण्यात येत असल्याचे श्री.कदम यांनी सांगितले आहे.
यापुढे वाहतुक पोलीसांकडून शाळा, प्रमुख चौक, गर्दीची ठिकाणे तसेच संवेदनशील परिसरात कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक नाकाबंदी करण्यात येणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कायद्यानुसार सक्त कारवाई केली जाईल.
पालक व विद्यार्थ्यांना आवाहन
विद्यार्थ्यांनी वैध वाहन परवाना असल्याशिवाय वाहन चालवू नये, ट्रिपल सीट प्रवास करू नये, वाहन चालविताना मोबाईलचा वापर करू नये, वेगाने अथवा बेदरकारपणे वाहन चालवू नये तसेच वाहनाच्या नंबर प्लेट व आवश्यक कागदपत्रांबाबत नियमांचे पालन करावे. पालकांनीही अल्पवयीन मुलांच्या ताब्यात वाहन देऊ नये. “नियम पाळणाऱ्यांना संरक्षण बेदरकार वाहनचालकांवर कायद्याची सक्त कारवाई”