मुंबई: आयटीआय प्रवेशाची दुसरी फेरी स्थगित करण्यात आल्याची माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने (डीव्हीईटी) दिली. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिलेल्या स्थगितीमुळे अकरावी आणि इतर प्रवेश प्रक्रियांप्रमाणे आयटीआय प्रवेश प्रक्रियातही हा निर्णय घेण्यात आलेला आहे. राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांतील (आयटीआय) प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीत प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांपैकी 31 टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे.
राज्यातील आयटीआय प्रवेशासाठी उपलब्ध जागांच्या दुप्पट अर्ज आले आहेत. शासकीय आयटीआयमध्ये 29.43 टक्के, तर खासगी आयटीआयमध्ये 38.46 टक्के प्रवेश झाले आहेत. पहिल्या फेरीतील प्रवेशाचे एकूण प्रमाण 31.3 टक्के आहे.
राज्य शासनाने मराठा आरक्षणाबाबतचा निर्णय घेतल्यानंतर ही प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात येईल, असे संचालनालयाने स्पष्ट केले आहे. दरम्यान विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने नवीन अर्ज भरण्याची आणि अर्जात बदल करण्याची मुभा देण्यात आली आहे. अधिक माहिती विद्यार्थ्यांना व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.