दिल्लीः अमेरिका- इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाल्यानंतर भारताने मृत्यूबद्दल कोणतीही प्रतिक्रिया न आल्याबद्दल विरोधी पक्षांनी सरकारवर टीका केली. त्यानंतर भारत सरकारने गुरुवार 5 मार्च रोजी शोक व्यक्त केला. परराष्ट्र विभागाचे सचिव विक्रम मिस्री यांनी नवी दिल्लीतील इराणच्या दूतावासाला भेट दिली आणि खामेनी यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करणाऱ्या पुस्तिकेवर सरकारच्या वतीने स्वाक्षरी केली.
अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात युद्ध सुरू असून 28 फेब्रुवारी रोजी इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांचा मृत्यू झाला. इराणने त्यानंतर 40 दिवसांचा शोक जाहीर केला. त्यामुळे मिस्री यांची इराणी दूतावासाला भेट आणि शोकपुस्तकावर स्वाक्षरी करणे हे महत्त्वाचे ठरले आहे.
मिस्री यांनी भारतातील इराणी राजदूत मोहम्मद फताली यांच्याशी चर्चा केली. दरम्यान, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी त्यांचे इराणी समकक्ष सय्यद अब्बास अरघची यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.