ज्यांना दादांनी भरभरून दिले, तेच दादांना का विसरत चालले आहेत…सर्वसामान्य माणूस आजही दादांच्या दुःखात…

ज्यांना दादांनी दिले भरभरून, तेच बसले दादांचे कार्य विसरून

ज्यांना दादांनी दिले भरभरून, तेच बसले दादांचे कार्य विसरून

बारामती(प्रतिनिधी): विकास पुरूष लोकनेते अजितदादा पवार यांना जावून सहा महिने झाले 22 जुलै रोजी त्यांचा वाढदिवस असतो. संपूर्ण महाराष्ट्र हा दिवस कधीही विसरू शकणार नाही.

ज्या व्यक्तींना अजितदादांनी भरभरून दिले तेच आज अजितदादांना विसरताना दिसत आहेत. एवढं मात्र नक्की अजितदादांनी ज्या सर्वसामान्य व्यक्तीवर जीवापाड प्रेम केले त्यांच्यासाठी रात्रीचा दिवस करून विकास केला. त्यांच्या अडचणी सोडविल्या, दुःख दूर केले. हेच सर्वसामान्य व्यक्ती आजही दादांच्या दुःखात आहेत.

बारामती हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून समजला जातो. याठिकाणी विविध मोठ-मोठ्या संस्था आहेत. त्या संस्थेच्या उद्धारासाठी दादांनी प्रयत्न केला. त्या संस्था नावारूपाला आणल्या. आज त्याच संस्थेवर कडक खादी कपडे घालून मिरवणारे दादांना विसरलेले दिसत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बारामती शहरने दादांच्या जयंतीनिमित्त प्रकाशित केलेल्या कार्यक्रम पत्रिकेवर नजर टाकल्यावर सर्वसामान्य कार्यकर्ता व माणूस फूल ना फूलाची पाकळी या नात्याने छोटा कार्यक्रम घेऊन आपल्या दादाला जयंतीनिमित्त अभिवादन करीत आहे ही खूप मोठी बाब आहे.

या सर्वसामान्य कार्यकर्ता किंवा माणसाने आयोजित केलेला कार्यक्रम खूप छोटा आहे. मात्र, दादांबद्दल यांच्या भावना खूप मोठ्या आहेत. आज ही मंडळी जरी नगरसेवक, संचालक झाली नसली तरी या पदाला लाजवेल एवढं मोठे कार्य ती करीत आहेत याची जान आणि भान दादांनी ज्या लोकांना भरभरून दिले त्यांनी ठेवली पाहिजे.

बारामती शहरात नगरपरिषद आहे या नगरपरिषदेत असणारी नगरसेवकांची संख्या, बारामती बँक याठिकाणी असणारी संचालक व आजी माजी चेअरमन व संचालकांची संख्या, कृषि उत्पन्न बाजार समिती, दूध संघ अशा इ. नावारूपाला असणाऱ्या संस्था व त्या संस्थेवर पदे भूषविलेली किंवा पदे भूषवित असलेली मंडळींना दादांच्या जयंतीचा विसर पडलेला दिसत आहे.

दादा म्हटलेच होते… राजकारण खूप वंगाळ आहे. या वाक्यावरून कधी कधी वाटते ही मंडळी पदे भूषवून पुन्हा दिसतील का नाही याची शाश्वती नाही. वेळ पडल्यास दुसऱ्या पक्षाचा उंबरठा झिजविण्याचा प्रयत्न सुद्धा करतील.

ज्या नेत्याने महाराष्ट्राचाच नव्हे तर बारामतीचा विकास केला. बारामतीचे नाव देशपातळीवर नेले. या नेत्यानेच तुम्हाला समाजात बसविले, उठविले आणि त्या नेत्यालाच त्याच्या जयंतीनिमित्त विसरत असाल तर येणाऱ्या काळात विविध संस्थांवर कोणाची निवड करायची हे राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांनी ठरविले पाहिजे.

राज्याचा कारभार सांभाळण्यासाठी दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना सुद्धा, या राज्यासाठी, या बारामतीच्या प्रत्येक नागरिकांसाठी तिसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री पदाची शपथ ना.सुनेत्रावहिनी पवार यांनी घेतली. याची जान व भान या कडक कपडे परिधान करून मिरविणाऱ्यांनी घेतली पाहिजे.

दादांना जावून सहा महिने झाले, त्यांची पहिलीच जयंती यावेळी तरी तुमचे दातृत्व दाखविण्याची गरज होती. दादांबद्दल असणारी कृतज्ञता दाखवून पालखी मार्गक्रम करणाऱ्या मार्गावर एक फ्लेक्स लावून तरी दादांच्या स्मृतीला उजाळा देण्याचे काम केले पाहिजे होते.

आजही काही पदे न घेतलेली मंडळी दादांना विसरलेले नाहीत. दर महिन्यातून दादा ज्या तारखेला गेले त्या तारखेला छोटा का होईना कार्यक्रम घेत आहेत. काही कार्यकर्ते व पदाधिकारी त्या दिवशी निरंकर उपास करतात तर काही दादांच्या स्मृतीवर जावून आशिर्वाद घेतात हेच दादांबद्दल मनातून येणारे प्रेम आहे. काहींनी वाढदिवस साजरा केला नाही तर काहींनी जयंतीनिमित्त तीन ते चार कार्यक्रम घेतले आहेत.

विशाल जाधव मित्र परिवार आजही दादांच्या दुःखातून बाहेर आलेला नाही. दादांना स्वच्छतेची आवड होती तोच धागा धरीत दर शनिवारी दादांचा फोटो लावून वेगवेगळ्या ठिकाणी स्वच्छता मोहिम राबवीत आहेत. यामध्ये कोणी मदतीला येऊ, प्रशासन साथ देऊ किंवा न देऊ याचा विचार न करता दादाप्रेमी मंडळी स्वतःला झोकून देऊन निष्ठेने काम करीत आहेत हे खूप वाखण्याजोगे आहे.

आज हे सर्व पाहुन दादांना सुद्धा प्रश्न पडला असेल, अरे मी माणसं निवडायला चुकलो रे… पण काय करणार दादांचीच वेळ चुकली अन्यथा दादांनी यांचा समाचार घेतला असता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!