अडीच वर्षाच्या मुलाने संपूर्ण हनुमान चालीसा म्हणून जागतिक विक्रम केला: सर्व स्तरातून कौतुक

बारामती(प्रतिनिधी): अवघ्या अडीच वर्षांच्या ध्रुव रोहन पवार या चिमुकल्याने संपूर्ण हनुमान चालीसा स्पष्ट उच्चारात म्हटत एक अनोखा जागतिक विक्रम नोंदवला आहे. एवढ्या लहान वयात त्याने दाखवलेली विलक्षण स्मरणशक्ती, एकाग्रता आणि भक्तीभाव पाहून सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

12 जानेवारी 2023 रोजी जन्मलेल्या ध्रुवचा हा अद्भुत पराक्रम 26 डिसेंबर 2025 रोजी अधिकृतरीत्या नोंदविण्यात आला. त्यावेळी त्याचे वय 2 वर्षे 6 महिने 14 दिवस इतके होते. एवढ्या लहान वयात त्याने संपूर्ण हनुमान चालीसा आत्मविश्वासाने आणि स्पष्ट उच्चारात म्हटल्यामुळे उपस्थित आश्चर्यचकीत झाले.

रोहन अरविंद पवार आणि ऐश्वर्या रोहन पवार यांचा सुपुत्र ध्रुव आहे. लहानपणापासूनच घरातील धार्मिक वातावरण आणि संस्कारांमुळे त्याला हनुमान चालीसाची ओळख झाली. पालकांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने ऐकून आणि सराव करून ध्रुवला संपूर्ण हनुमान चालीसा पाठ झाली आहे.

ध्रुवच्या या विलक्षण कामगिरीची दखल घेत Influencer Book Of World Records या आंतरराष्ट्रीय संस्थेने त्याचे नाव अधिकृतरीत्या नोंदवले आहे. “Tiny Voice, Timeless Devotion – Complete Hanuman Chalisa Recited at Just 2.5 Years” या विशेष शीर्षकाखाली हा जागतिक विक्रम मान्य करण्यात आला आहे. ध्रुवच्या या अद्वितीय,उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्रच्या पहिल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार, पद्मविभूषण सुधा मुर्ती, राज्यसभा खा.स्वाती मालीवाल आणि अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी ध्रुवचे मनःपूर्वक ध्रुवचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या. नगरसेवक अतुल दादा तरवडे यांनी रोख 5001 रुपयांचे बक्षीस देऊन त्याचा सन्मान केला. या अद्वितीय कामगिरीचे कौतुक करत त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

अवघ्या अडीच वर्षांच्या चिमुकल्याने केलेली ही अद्वितीय कामगिरी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत असून, लहान मुलांमध्ये संस्कार, श्रद्धा आणि स्मरणशक्ती वाढविण्याचा हा सुंदर आदर्श ठरत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!