13 वर्षानंतर उजळल्या महाविद्यालयीन आठवणी : बी.कॉमच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न

बारामती(प्रतिनिधी): 13 वर्षानंतर तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील बी.कॉम 2012-2013 बॅचचे माजी विद्यार्थ्यांनी एकत्रित येत स्नेहमेळावा आयोजन काटेवाडी (ता.बारामती) येथील आर्याबाग याठिकाणी केला होता.

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना आदरांजली वाहुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. याप्रसंगी माजी विद्यार्थ्यांनी परिचयातून मनोगत व्यक्त केले. माजी विद्यार्थ्यांपैकी कोणी प्रशासकीय अधिकारी, सीए, पत्रकार, पोलीस, वकील, व्यावसायिक, उद्योजक, शिक्षक, खेळाडू, प्रगतशील बागायतदार अशा विविध क्षेत्रात आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपला नावलौकिक करत असल्याचे दिसून आले.

या विद्यार्थी मेळाव्यात 125 ते 130 विद्यार्थी-विद्यार्थिनी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. 13 वर्षांनी एकत्रित आल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद, उत्साह आणि जुन्या आठवणींना उजाळा देणारा भावनिक रंग भरला होता.

महाविद्यालयीन जीवनातील विविध आठवणी, सांस्कृतिक कार्यक्रम, अभ्यासातील अनुभव तसेच त्या काळातील कॉलेजचे किस्से यांची मनमोकळेपणाने देवाणघेवाण करण्यात आली. कित्येक वर्षानंतर एकमेकांचा हास्यकल्लोळ पहावयास मिळावा. कार्यक्रमादरम्यान विविध मनोरंजनात्मक उपक्रम, खेळ तसेच चविष्ट स्नेहभोजनाचे उत्कृष्ट आयोजन करण्यात आले होते.

काही विद्यार्थ्यांनी आपल्या नोकरी, व्यावसायिक व सामाजिक क्षेत्रातील प्रवासाविषयी माहिती देत एकमेकांना प्रेरणा दिली. सर्वांनी समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा संकल्पही यावेळी व्यक्त केला.

या कार्यक्रमाचे नियोजन आणि संयोजन माजी विद्यार्थ्यांच्या समितीमार्फत करण्यात आला होता. स्वाती ताम्हाणे, नितेश शर्मा यांनी या विद्यार्थी स्नेहमेळाव्याचे आयोजन करून सर्वांना एकत्रित आणण्याचा मनोमन प्रयत्न केला.

सर्वांच्या सहकार्यामुळे स्नेहमेळावा यशस्वीपणे पार पडला. शेवटी एकमेकांसोबतच्या आठवणी कॅमेऱ्यात कैद करून लवकरच भेटण्याचे आश्वासन देत कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!