इंदापूर(प्रतिनिधी-अशोक घोडके): केंद्रीय तपास यंत्रणेचा (ई.डी.) चा गैरवापर करून भारतीय जनता पार्टी हुकूमशाहीच्या मार्गावर काम करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी इंदापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत करून जाहीर निषेध केला आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी मंत्री जयंतराव पाटील यांना केंद्रीय तपास यंत्रणा (ई.डी.) ने दुसर्यांदा नोटीस आलेले आहे. या संदर्भात जयंत पाटील यांनी चौकशीच्या अनुषंगाने पूर्ण सहकार्य करण्याचा शब्द दिलेला आहे. परंतु केंद्र सरकार द्वारा केंद्रीय तपास यंत्रणेद्वारा राज्यातील विरोधी पक्षातील कार्यक्षम लोकांना घाबरवण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
देशभरात चुकीच्या पद्धतीने ईडीच्या माध्यमातून कारवाई होत आहे. लोकशाही टिकण्यासाठी ई.डी.चा गैरवापर थांबवावा. विरोधकांचा आवाज दाबण्याच्या हेतूने आणि सुडाच्या भावनेने केंद्रीय तपास यंत्रेचा गैरवापर होत आहे. अशा प्रकारच्या नोटीसा काढून विरोधी पक्षाचे तोंड बंद ठेवून जेणेकरून सत्य लपले जाईल व आपणच सत्य आहोत ही भावना सरकारच्या मनी वाढीस लागत आहे.
लोकशाहीसाठी ही बाब अत्यंत घातक व मारक असून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे पुणे जिल्हा ग्रामीणच्या वतीने आम्ही जाहीर व तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत आहोत असे यावेळी गारटकर म्हणाले