बारामती(वार्ताहर): माझं आरोग्य आणि माझ्या कुटुंबाचं आरोग्य, माझी जबाबदारी.. सरकार घेतय खबरदारी आपण घेऊ जबाबदारी… या मथळ्याखाली सामाजिक भावनेतून सध्या सुरू असलेली कोरोना विषाणूच्या रोगामुळे मानवाच्या मनात असणारी भिती, होत असलेली वाताहात पाहता ग्रामीण भागात लोक सहभागातून कोविड सेंटर उभारण्याची तळमळ अखिल भारतीय मानवी हक्क संघटना (दिल्ली) बारामती शाखा अध्यक्ष मुनीर तांबोळी यांनी आपल्या लिखाणातून व्यक्त केली आहे.
जागतिक कोरोना विषाणूमुळे सर्वत्र जनजीवन विस्कळीत झालेले आहे. येणारा काळ खुप कठीण आहे आताच आपण सामाजिक जान व भान जपत पाऊलं उचलण्याची गरज आहे. आरोग्य क्षेत्रावरील वाढत असलेला ताण पाहता व उपचाराविना कोणाच्या जीवाचे बरे वाईट होऊ नये हा केविलवाणा प्रयत्न त्यांनी मांडलेला आहे. ग्रामीण भागात शाळा, महाविद्यालय, (जेथे सरकारी रुग्णालयाची सोय आहे त्या जवळपास) कोविड सेंटर उभारणी करून कोरोनाची लक्षणे आढळणार्या संशयित रूग्णावर जास्त होण्यापुर्वीच या कोविड सेंटरमध्ये उपचार केल्यास जो तालुका, जिल्हा पातळीवर आरोग्य क्षेत्रावरील ताण नक्कीच कमी होईल. एखादा गावातील रूग्ण तालुका व जिल्हा रूग्णालयात नेल्यानंतर कुटुंबावर असणारा ताणतणाव, भिती कमी करण्यामध्ये आपण नक्कीच यशस्वी होऊ शकतो. सर्व सोयीयुक्त व कमीत कमी वेळेत रूग्ण बरे होऊन आपल्या कुटुंबाच्या सहवासात जातील. ज्या रूग्णाची अत्यंत बिकट अवस्था होईल त्यास तालुका पातळीवरील रूग्णालयात दाखल करून ऑक्सिजन, व्हेंटीलेटर इ. तातडीने उपचार करता येतील.
आपली आरोग्य सुरक्षा जबाबदारी आपली समजून कोविड सेंटर उभारू ही त्यांची तळमळ लवकरच साक्षात उतरले यात शंका नाही. आजच्या परिस्थितीत पैसे देऊनही रूग्णांना बेड उपलब्ध होत नाही, उपचार उपलब्ध होत नाही ही खूप दयनीय अवस्था होऊन बसली आहे. त्यामुळे लोकसहभागातून ग्रामीण भागात पहिले कोविड सेंटर उभा राहणे गरजेचे आहे. आपण समाजाचं काही तरी देणं लागतो या उद्देशातून ग्रामपंचायत, दानशूर व्यक्ती, सहकारी संस्था, मंडळे, स्थानिक खाजगी डॉक्टर यांच्या मदतीने नक्कीच शक्य होऊ शकते. एखादा संशयित रूग्ण घरा शेजारी असल्यास आपल्या कपाळावर आट्या पडल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे कोविड सेंटर असल्यास त्याठिकाणी तो उपचार घेऊन लवकर त्यातून बाहेर पडेल अशी प्रार्थना ग्रामस्थ करतील.
तांबोळी यांनी आपले अमूल्य असे विचार नागरीकांसमोर ठेवलेले आहेत यामध्ये आणखी काही सुचना असतील त्याचे स्वागत सुद्धा केले जाईल असेही त्यांनी सांगितले आहे. ग्रामीण भागात कोविड सेंटर उभारल्यास शहरातील सरकारी आरोग्य अधिकारी यांच्या देखरेखीखाली चालवावे. स्थानिक डॉक्टरांनी सुद्धा सामाजिक बांधिलकी म्हणून या कोविड सेंटरमधील रूग्णांची पाहणी करावी. शाळेतील वेगवेगळे कक्ष व खोल्यांमध्ये विलगीकरण करणे. लागणारी औषधे व उपचार सरकारी यंत्रणेमार्फत मिळवून देणे. रूग्णाची जेवणाची व्यवस्था त्याचे कुटुंबीय किंवा कोविंड सेंटरच्या माध्यमातून करावी. रूग्ण गावात उभारलेल्या कोविड सेंटरमध्ये राहिल्यास त्यास घरचे उत्तम जेवण, प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी योगा व आत्मविश्वास वाढविण्यासाठी कुटुंब, मित्र मंडळींचे फोन जाईल व गावातच तो रूग्ण बरा होईल. ज्याचे अंगातील तापमान व ऑक्सिजन कमी झाल्याचे कळताच तातडीने सरकारी रूग्णवाहिकेत किंवा कोविड सेंटरच्या खाजगी रूग्णवाहिकेमध्ये तालुका, जिल्हा पातळीवर उपचारासाठी तातडीने नेता येईल. अजुनही वेळ गेलेली नाही आरोग्य अधिकारी, ग्रामस्थ, तरुण मित्र मंडळ, सहकारी संस्था, दानशूर व्यक्ती, प्रतिष्ठान, एनजीओंंच्या सूचना व सहकार्य घेऊन लवकरच आपण ग्रामीण भागातील पहिले कोविड सेंटर उभारू व मानव जातीचे या विषाणूपासुन संरक्षण करू.