बारामती(वार्ताहर): कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर फ्रंट लाईनवर लढणारे कोरोना योद्धे म्हणून नगरपरिषदेच्या आरोग्य विभागातील सफाई कर्मचार्यांकडे पाहिले जाते. या योद्ध्याच्या प्रती दुसरे योद्धे म्हणजे बारामती शहर पोलीसांच्या वतीने, चहा व बिस्कीटचे निमित्ताने या कर्मचार्यांबाबत जी आपुलकी, कृतज्ञता व मनाची श्रीमंती दाखवली यामुळे सर्व सफाई कर्मचारी भावुक झाले होते.
पोलीस व सफाई कर्मचारी हे दोन्ही योद्धे कोरोनासारख्या अदृश्य शत्रूविरोधातील लढ्यात जीवाची पर्वा न करता आपली सेवा बजावीत आहेत. आपला परिसर व शहर स्वच्छ ठेवण्यासाठी झटणार्या सफाई कर्मचार्यांबद्दल चहा-बिस्कीटचे वाटप करून जी आपुलकी बारामती पोलीसांनी दाखवली ती वाखण्ण्याजोगी आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक आदुंबर पाटील, सहा.पोलीस निरीक्षक योगेश शेलार, पद्मराज गंपले यांनी या आरोग्य कर्मचार्यांशी संवाद साधला. यावेळी आरोग्य निरीक्षक राजेंद्र सोनवणे, अजय लालबिगे, आरोग्य कर्मचारी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.