हसरा चेहरा, बोलके डोळे, सदैव उत्साह, खट्याळ पण मिश्किल व प्रांजळ स्वभाव, विचारांची सकारात्मकता संस्काराने परिपूर्ण. दुसर्याच्या मदतीला तत्पर, जगन्मित्र. नाती सांभाळणारे जोपासणार, कुटुबवत्सल, स्वाभिमानी दिलखुलास व्यक्तिमत्व… अशा एक ना अनेक गुणांचा संगम असणारे माझे आण्णा अक्षरश: राजा माणूस पूर्ण विचारांती योग्य निर्णय घेऊन आचरणात आणायचा, नीटनेटकेपणा, हाती घेतलेले काम तडीस न्यायची इच्छाशक्ती त्यांच्यामध्ये होती. झट की पट निर्णय आणि कृती. ’चांगल्याला चांगलच म्हणायचं, बळंच कशाला वाईट करायचं. हे सुत्र त्यांनी अंगीकारले होते.
आण्णा वेळेचे काटेकोर पालन करणारे होते. बँक ऑफ बडोदा म्हणजे तर जीव की प्राण होता. अतिशय प्रामाणिकपणे क्लार्क ते शाखाधिकारी पर्यंतचा उत्तम प्रवास केला. एकावेळी अख्खी ब्रँच हँडल करणार्या आण्णांना त्यांच्या मित्रांनी सी.व्ही.म्हणून पदवी दिली होती. सर्वांच्या मदतीला धावणारे व कोणालाही नाराज न करणारे आण्णा होते. दांडगा जनसंपर्कामुळे भेटणार्याशी थोडं का होईना बोलल्याशिवाय पुढे जात नव्हते.
नाती कधी जपायची हे आण्णाकडून शिकावे तेवढे कमीच आहे. आई-वडिलांना दिलेला शब्द त्यांनी पाळला. मोठ्या दोन्ही भावांना कायम साथ व धाकट्या तिन्ही भावंडांमध्ये कधीही अंतर त्यांनी पडू दिला नाही. त्यांचा इतका उत्साह होता की, कुटुंबातील नव्हे तर पै-पाहुण्यांशी मनमोकळेपणे गप्पा मारीत होते. चिन्मय- सोहम, केतकी, सलोनी चारही नातवंडांवर आजी-आजोबाचे प्रेम दिले.
कुटुंबामध्ये पत्नीचा सहवास खुप महत्वाचा असतो. त्याचप्रमाणे त्यांनी आईला जीवापाड जपले तिची सर्व हौसमौज, लाड, पुस्तके लिहिण्याच्या छंदास प्रोत्साहन दिले. आईनेही तिचे अधिकार व कर्तव्याचे पालन केले. आण्णांच्या दीर्घायुष्यासाठी एक कोटी रामनामाचा जप, प्रत्येक वाढदिवशी सत्यनारायण, एकसष्ठीपूर्ती, अमृतमहोत्सव केले. आण्णांचे आरोग्य ठणठणीत राहावे त्यासाठी आई स्वत:ची आवड विसरून गेली होती. हे सर्व मी आणि नेत्रा पाहत लहानाचे मोठे झालो.
आमचे चार व्यक्तींचे कुटुंब त्यात नेत्रा शेंडेफळ, त्यामुळे कायम लहानच आणि तितकंच लाडकं. Every first born daughter is the female version of her dad. आण्णांची ज्येष्ठ कन्या म्हणून मला ह्या वाक्याचा अभिमानच नाही तर गर्व आहे. आण्णांनी कधीही धाकात न ठेवता मित्रत्वाचा आधार दिला. आमच्यात आदरयुक्त भिती होती दडपण नाही. आयुष्यातील कोणतीच गोष्ट त्यांच्यापासून लपली नाही. त्यामुळे आमची निर्णय क्षमता वाढली. पुढच्या प्रत्येक जन्मी याच आई-वडिलांच्या पोटी जन्म घ्यावा व असेच सुखी कुटुंब अखंडीत रहावे यासाठी ईश्र्वराजवळ सतत प्रार्थना करणार.
आण्णा आचार-विचार, संस्कारांनी धनवान होते. माणसं जोडण्याची हातोटी त्यांच्यामध्ये होती. आण्णांचे प्रत्येक वाक्य एका वर्षातच क्षणाक्षणाला अनुभवयाला मिळाले. ’आण्णांच्या मुली’ हा शब्द जरी कानी पडला तरी मान उंच होते.
आण्णांना जावून आज एक वर्ष झालं. अजूनही मन मानत नाही. त्यांच्या जाण्याने प्रत्येक व्यक्तीने मनापासून हळहळ व्यक्त केली. आईवर, जोशी परिवारावर सुभेदार, मुळे, वाशिमकर सर्व कुटुंबियांवर अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळलाय. चित्रा, नेत्रा आजही आण्णांची क्षणाक्षणाला आठवण येते. मन आणि हृदय आजही साक्ष देत नाही की आण्णा नाहीत म्हणून, कोणताही प्रसंग असो आण्णांची आठवण येत असते.
आण्णा आज आमच्यापासून लांब, परत कधीही न दिसण्यासाठी पुढच्या प्रवासाला गेले. त्यांचं परत न येण्यासाठीचं असं जाणं किती क्लेशदायक आहे हे सांगायला शब्द अपुरे आहेत. माझ्या उर्वरीत आयुष्यात आण्णांचं माझ्याबरोबर नसणं, हे दुःख माझ्या अखेरच्या श्वासाबरोबरच संपणार.
त्यांच्या फोटोकडे पाहिलं की तीच प्रेमळ आश्वासक वात्सल्यमूर्ती आम्हाला सांगत आहेत. ’अंजलीच्या आणि माझ्या संस्कारांवर माझा पूर्ण विश्वास आहे. चित्र-मनू, संपूर्ण आयुष्य समाधानाने जगा. सुखाने संसार करा. मी अखंड तुमच्या पाठीशी आहे!’ आण्णांचा हा विश्वासपूर्ण आशिर्वाद आम्हाला जगण्याचे बळ दवो.
देवांचे देव महादेव, शिव-शंकर कैलासनाथाचरणी माझी एकच प्रार्थना आहे. आमच्या आण्णांची काळजी घे, जिथे असतील तिथे त्यांना सुखरूप ठेव!
- सौ.चित्रा नरेंद्र मुळे, M.Com