बारामती विभागात बालपचारी मुलांचे समुपदेशन शिबिर संपन्न

बारामती(वार्ताहर): वाढती बालगुन्हेगारी पाहता पुणे ग्रामीण पोलीस दल व होप फॉर द चिल्ड्रन फाउंडेशन या अशासकीय संस्थेतर्फे शासकीय बाल सुधारगृह बारामती या ठिकाणी बारामती उपविभागातील बालपचारी मुलांचा समुपदेशन शिबीर संपन्न झाले.

सदर शिबिराचे आयोजन पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे व उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या आदेशान्वये बाल निरिक्षण गृह, बारामती याठिकाणी आयोजित करण्यात आले होते.

या शिबिरामध्ये बारामती शहर, तालुका यामध्ये माळेगाव, वडगाव निंबाळकर, इंदापूर, वालचंदनगर व भिगवण या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मागील पाच वर्षात ज्या मुलांकडून अपराध घडलेले आहेत त्या मुलांना समुपदेशन करण्यात आले. या शिबिरामध्ये 50 मुलांनी सहभाग नोंदवला. या शिबिरात होप फॉर द चिल्ड्रन फाउंडेशन संस्थेचे पदाधिकारी शकील शेख, वसीम शेख, विशाल वाघमारे, सचिन करंजुले, अजय वाघ, शामल चव्हाण या समुपदेशन तज्ञांनी मार्गदर्शन केले. या शिबीरास बाल निरिक्षण गृहाच्या अधिक्षक सौ.जगताप उपस्थित होत्या तर बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक हे साध्या गणवेशात या शिबिरास उपस्थित होते.

जुवेनाईल जस्टिस ऍक्ट प्रमाणे मुलांचे हक्क त्यांना मिळाले पाहिजेत हा जागतिक संदर्भ असल्यामुळे या मुलांच्यावर कायद्याने कठोर कारवाई करता येत नाही. आणि प्रोफेशनल गँग अशा मुलांचा वापर करत आहेत. त्यामुळे कोयता गँग पासून ते दरोडेखोरी खूना सारख्या घटनांमध्ये बाल अपचारी मुलांचे प्रमाण वाढत आहे.

पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक मुलांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, गौतम बुद्ध, वाल्याचा कोळ्याची गुन्हेगारी त्यानंतर तो वाल्मिकी ऋषी होऊन कसा अजरामर झाला याचे दाखले दिले. मुलं छोट्या वस्तु चोरीतून मोठे गुन्हेगार बनू शकतात. पालक व गुरूंनी त्याच्यावर चांगले संस्कार केले नाही तर तो स्वत:च्या पालकांना व गुरूंना सुद्धा माफ करत नाही. पालकांची सुद्धा संगोपनाची जेवढीच जबाबदारी पार पाडावी असेही ते म्हणाले. तुमच्याकडे असणारी शक्ती चांगल्या कामसाठी खर्च केली पाहिजे. वाईट मार्गाला केली तर त्याचा अंत ठरलेला आहे. भगवान शंकराने रावणाला सर्व शक्ती प्रदान केली होती परंतु, त्या शक्तीचा दुरूपयोग केल्यावर त्याचा अंत काय झाला असे उदाहरण ही श्री.महाडिक यांनी दिले.

महाडिक पुढे म्हणाले की, बालपचारी मुलं सुद्धा समाजाचा एक भाग आहे. इतरांपेक्षा या मुलांची बुद्धिमत्ता किंवा कौशल्य जास्त असते. या मुलांना योग्य दिशा मिळाली नाही तर त्यांच्याकडून सतत अपराध घडत असतात. त्यामुळे त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पोलीस, एनजीओ व आपणास सर्वांनी जबाबदारी असल्याचेही त्यांनी सांगितले. शेवटी मुलांना अल्पोपहार चहा पाणी देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

या शिबिराच्या आयोजनामध्ये उपयोगी पोलीस अधिकारी कार्यालयाचे पोलीस उपनिरीक्षक सुरेश गीते, पोलीस अंमलदार दशरथ कोळेकर, कल्याण खांडेकर, अतुल जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!