राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या संवेदना बोथट झाल्या आहेत…

गेल्या महिन्याभरापासून महाराष्ट्रात राजकीय नेतेमंडळींच्या सभांची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. जश्या निवडणूका जवळ येतात तसे राजकीय मंडळींच्या अंगात येते असे म्हटले जाते त्याप्रमाणे सभांची तयारी सुरू असते. सभांमध्ये काय बोलावे, काय बोलू नये याचे तारतम्य सर्वांनीच पाळले पाहिजे ते लोकशाहीच्या हिताचे असते. नागरीकांमध्ये सध्या एकच सुर येतो गलिच्छ राजकारण सुरू आहे यांना कोणी लगाम घालणार का नाही.

मध्यंतरी तर एकाच्या घरी नांदायचे, दुसर्‍याचे मंगळसूत्र घालायचे, उखाणा तिसर्‍याचा घ्यायचा आणि गर्भ मात्र चौथ्याचा वाढवायचा अशी विचित्र परिस्थिती महाराष्ट्राच्या राजकारणात मध्यंतरी पहावयास मिळाली. राजकारणात महिलांचा वापर स्वत:च्या आणि गलिच्छ राजकारणासाठी केला जात आहे. शिवसेना पक्ष असा होता की, कोणी या पक्षाबद्दल किंवा पक्षातील नेत्याबद्दल बोलले तर त्यास घरातून ओढून काढून मारण्याची प्रथा होती. त्यामुळे या पक्षाबद्दल कोणी ब्र शब्द काढीत नव्हता हे त्रिकाल सत्य आहे. सध्या कायद्याची अंमलबजावणी तंतोतंत असल्याने असे प्रकार क्वचित घडतात हे ही मान्य करावे लागेल.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे विचार म्हणजे पवार साहेबांचे विचार म्हटले जातात. शांत, संयमी, 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण करणे हे पवार साहेबांकडून शिकावे तेवढे कमी आहे. महाराष्ट्र व देशाच्या राजकारणात पवार साहेबांच्या वयाचा विचार केला असता त्यांच्या इतका अनुभव कोणाला नसेल. आज त्यांना व त्यांच्या पक्षाला म्हणजे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला उठसूठ कोणीही कालचा आलेला जिभेला हाड नसल्याप्रमाणे लावली जिभ टाळ्याला असे गलिच्छ वक्तव्य करीत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील तळागळातील विशेषत: ज्यांनी पक्षाच्या नावाखाली स्वत:ची प्रतिष्ठा, आर्थिक परिस्थिती गडगंज केली आहे त्या सर्वांच्या संवेदना बोथट का? झाल्या आहेत.

तळागळातील कार्यकर्ते आर्थिकदृष्ट्या मागे असतील त्यांना बाह्या वर करणे किंवा एखाद्याला सुनावणे जमत नाही. मात्र, पक्षाच्या नावाखाली गडगंज झालेले मुग गिळून गप्प का? हा खरा प्रश्र्न आहे. एखाद्याच्या कुटुंबातील ज्येष्ठाला जर रस्त्याने जाताना कोणी काही बोलले तर आपण बोलणार्‍याला दोन शब्द सुनावतो. आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पितामह समजल्या जाणार्‍या माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार यांच्याबाबत कालचा आलेला पोरगा उलट-सुलट बोलत असेल, सभांमध्ये, पत्रकार परिषदांमध्ये अवमान, अपमान करीत असेल तरी पक्षातील कार्यकर्ते बघ्याची भूमिका का घेत आहेत.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे संघटन ढासळले का? कार्यकर्त्यांना पक्षाबाबत व पक्षातील नेत्यांबाबत आदर, निष्ठा राहिली नाही का? असा प्रश्र्न समोर येतो. तळागळातील कार्यकर्त्यांची याबाबत चर्चा केली असता त्यांनी ठोसपणे सांगितले की, पक्षाची रॅली, निवडणूका, कार्यक्रम, आंदोलन इ. असेल तर सर्वसामान्य कार्यकर्ता रस्त्यावर उतरून पक्ष व नेत्यांसाठी काम करीत असतो. ज्यावेळी पक्षाची पदे वाटप करावयाची असल्यास जो आर्थिक परिस्थितीने गडगंज आहे त्याचा प्रथमत: विचार केला जातो. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीत यांचाच विचार केला जातो. ही गडगंज मंडळी पद आहे तोपर्यंत पक्षाचे व पक्षाच्या नेत्यांचे गुण गातात नंतर पुन्हा सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत झेंडा घेऊन, घोषणा द्यायला. यामुळे माझ्या मते कार्यकर्त्यांमध्ये पक्षाबाबत व पक्षाच्या नेत्यांबाबत संवेदना बोथट झालेल्या दिसत आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा सर्व जाती,धर्माला बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे. पक्षाचे उच्च विचार आहेत. पक्ष व नेत्यांवर कोणी बोलले तर त्यास दोन हात करणे हे गैर आहे. मात्र, जे गैर वक्तव्य करतात त्यांना त्यांच्याच भाषेत सुनावणारे पक्षात अभ्यासक प्रचारक पाहिजे. समोरच्याचे तोंड बंद करणारे वक्तृत्व पाहिजे. या सर्वांचा विचार केला तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा विचार पक्षात होत नाही तर ज्याच्या अंगी वक्तृत्व आहे, बोलण्याची धमक आहे यांचा विचार पक्ष कधी करेल हा खरा प्रश्र्न आहे. याबाबत पक्षाने जागृत झाले पाहिजे अन्यथा कोणीही शेंबडं येईल आणि पक्ष व पक्षाच्या नेत्याबाबत खडेबोल सुनावेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!