इंदापूर(प्रतिनिधी-अशोक घोडके): निमगाव केतकी उपकेंद्रावरील व्याहाळी, कौठळी, वरकुठे खुर्द, पिटकेश्वर, कचरवाडी, इंदापूर फिडर निमगाव केतकी गावठाण या ठिकाणचे असणारी लोकसंख्या पाहता या उपकेंद्रावर जास्तीचा भार येत असल्याने 1×5 मेगाव्होल्ट अँपइर क्षमतेचा रोहित्र बसविण्याची गरज असल्याचे सामाजिक कार्यकर्ते अमोल राऊत यांनी माजी राज्यमंत्री आ.दत्तात्रय भरणे यांना मागणी केली आहे.
निमगाव केतकी येथील उपकेंद्र 33/11 किलोव्हॅटचा पुरवठा आहे. उपकेंद्रात एकुण आठ 11 किलोव्हॅटचे फिडर आहेत. या 11 किलोव्हॅटच्या फिडरमध्ये 6 शेतीपंप, 1 गावठाण, 1 इंडस्ट्रीजचे फिडर आहेत. गेल्या चार वर्षापासून शेतीपंपाचे फिडरवर जास्तीचा भार आला आहे. यामुळे जानेवारी महिन्यापासून ते पावसाळा संपेपर्यंत म्हणजे 6 ते 7 महिने शेतीपंपाचे फिडर सिंगलफेज सप्लाय पूर्णपणे बंद ठेवावे लागत आहे. या महिन्यांमध्ये ग्राहक उन्हाच्या झळा सोसत विद्युत पुरवठा बंद राहिल्यास उकाड्याचा त्रास होणार आहे.
4 वर्षांपूर्वी झगडेवाडी येथे 1×5 क्षमतेचे नवीन 1 उपकेंद्र मंजूर झाले त्याचे काम आजही प्रलंबित आहे. हे काम पूर्ण झाल्यास फक्त 1 शेतीपंपाच्या 6 फिडर पैकी 3 फिडर वरील लोड कमी होणार आहे. त्यामुळे जुन्या उपकेंद्रामध्ये 1×5 एम.व्ही.ए. क्षमतेचे नवीन रोहितेची गरज आहे. त्यानंतर एकूण 6 फिडर वरील लोड पूर्णपणे कमी होईल.
निमगाव केतकी गावाचा परिसर खूप मोठा आहे. तसेच गावाच्या पूर्ण परिसरातून निरा डावा कालवा असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये उपकेंद्रातील जास्तीचा भार पूर्णपणे वाढत आहे.