राष्ट्रवादी कॉंग्रेसचा अवघ्या साडेतीन जिल्ह्यापुरता मर्यादित पक्ष – प्रा.राम शिंदे

इंदापूर(प्रतिनिधी-अशोक घोडके): राष्ट्रवादी कॉंग्रेसचा अवघ्या साडेतीन जिल्ह्यापुरता मर्यादित पक्ष राहिलेला आहे. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पूर्ण कार्यक्रम केल्याशिवाय भाजप गप्प बसणार नाही असा इशारा यावेळी बोलताना प्रा. राम शिंदे यांनी दिला

इंदापूर तालुक्यातील राजकीय दृष्ट्‌या महत्त्वाच्या समजल्या जाणार्‍या बोरी गावातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भाजप नेते हर्षवर्धन पाटील व माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये शुक्रवारी (दि.24) प्रवेश केला. याप्रसंगी प्रा.शिंदे बोलत होते.

या प्रवेश मेळाव्यास राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, पुणे जिल्हा भाजपचे अध्यक्ष गणेश भेगडे, भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे, बाबा महाराज खारतोडे, वसुंधरा सोशल फाउंडेशन अध्यक्ष वैभव देवडे, सचिन वाघमोडे आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास अविनाश मोटे, इंदापूर तालुकाध्यक्ष ऍड. शरद जामदार, बारामती तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे इ. मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना प्रा.शिंदे म्हणाले की, तोच माणूस दिसेल तसे बोलल्याने शब्दाला किंमत राहत नाही, असा टोला राम शिंदे यांनी आ. दत्तात्रय भरणे यांना नाव न घेता लगावला. बोरी गावाने मागील विधानसभा निवडणुकीत जर साथ दिली असती, तर निवडणुकीत चित्र वेगळे दिसले असते व आज हर्षवर्धन पाटील मंत्री दिसले असते असेही ते म्हणाले.

हर्षवर्धन पाटील मनोगत व्यक्त करतान म्हणाले की, मी 20 वर्षे मंत्री असताना सणसर कट मधून खडकवासल्याचे पाणी या परिसरासाठी मिळत होते. सध्याच्या लोकप्रतिनिधीच्या काळात गेली साडे आठ वर्षात तालुक्यात नवीन एक गुंठा क्षेत्र सिंचनाखाली आणले नाही. ग्रामपंचायत निवडणूक लढवलेल्या संपूर्ण पॅनलने भाजपमध्ये प्रवेश केल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसला गावामध्ये मोठे खिंडार पडले आहे.

ते पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना- भाजप सरकारने लाकडी-लिंबोडी योजनेसाठी टेंडर काढले असून, येत्या काही आठवड्यात निविदा फायनल होईल.विकास कामासाठी दूरदृष्टी असलेले नेतृत्व लागते. नुसती हावभाव करून गोड बोलून विकास होत नाही अशी टीका आ. भरणे यांचे नाव न घेता पाटील यांनी केली. आपण वीस वर्षे मंत्री असताना कधी कोणाची आडवणूक केली नाही. भाजप प्रवेश केल्यावर नवा जुना असा वाद नसतो. सर्वांना मान- सन्मान मिळेल, सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन काम करणारा भाजप पक्ष आहे असेही त्यांनी शेवटी सांगितले.

प्रारंभी हर्षवर्धन पाटील व राम शिंदे यांची गावातून घोड्यावरून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर भाजप शाखेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. प्रवेश केलेल्यांमध्ये ग्रामपंचायतीचे 5 सदस्य, प्रमुख कार्यकर्ते व युवकांचा समावेश आहे असे बहुसंख्य लोकांनी प्रवेश केला.

यावेळी प्रियांका ठोंबरे, स्वाती वाघमोडे, गौरी ढालपे, सचिन ढालपे, कांचन धायगुडे या ग्रा. पं. सदस्यांसह ऍड. मधुकर वाघमोडे, सचिन वाघमोडे, माजी ग्रा. स. सदस्य रमेश पवार, दयानंद चव्हाण, विजय देवडे तसेच आकाश गवळी, हनुमंत लांबाते, शिवदास जगताप, गणेश पवार, सागर देवडे आदी गावातील असंख्य युवक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच यावेळी कर्दनवाडी येथील भैरवनाथ पाणीपुरवठा संस्थेचे अध्यक्ष विशाल जाधव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी उपाध्यक्षपदी नियुक्तीचे पत्र वैभव देवडे यांना तसेच भटक्या विमुक्त जिल्हा उपाध्यक्षपदी निवडीचे पत्र बापू लाळगे यांना देण्यात आले.

प्रास्ताविक ऍड. मधुकर वाघमोडे यांनी केले. या कार्यक्रमास इंदापूर तालुक्यातील भाजपचे सर्व पदाधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन वसुंधरा सोशल फाउंडेशन, जय मल्हार भैरवनाथ परिवर्तन पॅनल व भाजप बोरी यांनी केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!