बारामती(प्रतिनिधी): जनहिताची तळमळ असणारे महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते आ.अजितदादा पवार यांच्या नेतृत्वामुळे व मुस्लिम बँकेचे संचालक आलताफ हाजी हैदरभाई सय्यद यांच्या पाठपुराव्यामुळे मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळातर्फे 3 कोटी रूपयांचे कर्ज मंजुरी पत्राचे वाटप आ.अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते लाभार्थ्यांना करण्यात येणार असल्याचे आलताफ सय्यद यांनी सांगितले.
रविवार दि.19 फेब्रुवारी 2023 रोजी दु.2 वा. एकता महिला नागरी सहकारी पतसंस्था, गुनवडी रोड, देवळे पेट्रोलपंपासमोर बारामती याठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बारामती शहरातील अल्पसंख्यांक समाजातील 100 छोट्या व्यावसायिकांना प्रत्येकी 3 लाख प्रमाणे एकुण 3 कोटी रूपयांचे कर्ज मजुरी पत्राचे वाटप करण्यात येणार आहे.
एकुण शंभर प्रकरणे मंजूर करण्यासाठी आ.अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले. वेळोवेळी मुंबई दौरे, कागदपत्रांची पुर्तता केली, रात्रीचा दिवस करून सर्व प्रकरणे जिल्हा, विभाग व मंत्रालयातून मंजूर करून घेतली. अल्पसंख्यांक समाजातील कष्टकरी, छोटे मोठे लघुउद्योग करणार्यांना हे कर्ज मिळणार आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष अल्पसंख्यांक विभागाच्या माध्यमातून आलताफ सय्यद यांनी आपल्या सामाजिक व राजकीय कार्याची सुरूवात केली ते कार्य अखंडपणे सुरू आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या माध्यमातून लोकहिताची तळमळ असणारा युवा नेता नागरीकांना मिळाला आहे. विचारांशी बांधिलकी ठेवून सातत्याने समाजासाठी कार्यरत राहण्याचे काम आलताफ सय्यद यांनी केले आहे. आजपर्यंत सर्वसामान्य जनतेसाठी त्यांनी केलेले काम अभिमानास्पद आहे. ते कार्य करीत असताना काहींनी बोटं दाखविली तर काहींनी बोटं मोडली, काहींनी पेपरबाजी करून नाव धुळीस मिळवण्याचे काम केले मात्र, तेच आता धुळीस मिळाल्याचे दिसते. निंदनाचं घर असावं शेजारी या उक्तीप्रमाणे त्यांनी काम सुरूच ठेवले ते आजतगायत न थांबता काम करत आहेत.
या कर्ज प्रकरणातून गोर-गरीब, कष्टकर्याच्या कुटुंबाला आर्थिक हातभार लागणार आहे. याचे पुण्य विरोधी पक्षनेते आ.अजितदादा पवार व आलताफ सय्यद यांच्या पदरी पडणार आहे यात तिळमात्र शंका नाही.
मंजूरी पत्र वाटप कार्यक्रमाप्रसंगी मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाकडे आणखीन कर्ज प्रकरण प्रस्ताव सादर करणार आहे. ज्या कोणा लाभार्थ्यांना याचा लाभ घ्यावयाचा असेल त्यांनी याठिकाणी येऊन नाव नोंदणी करावी असेही आलताफ सय्यद यांनी सांगितले आहे.