शासनाच्या सेवेत काम करणारे काही अधिकारी व कर्मचारी असे काम करतात की, त्यांना शासकीय अधिकार्यातील विभीषणाची पदवी द्यावी तेवढी कमीच आहे. विभीषणाची थोडी माहिती पाहिल्यास लंकापती रावणाचा धाकटा भाऊ विभीषण होता. विभीषणाने अधर्म नितीच्या विरोधात काम करणार्यांना साथ न देता जो सरळ मार्गी काम करणार्याला साथ दिली.
तसाच काहीसा प्रकार शासनाच्या सेवेत काम करणार्या बारामतीतील काही अधिकारी व कर्मचार्यांचा सद्यस्थितीला सुरू आहे. हे अधिकारी मूळापासून भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी भ्रष्टाचाराने आभाळ फाटले आहे हे माहित असताना सुद्धा त्यास जाता..जाता..एक टाका मारून जावे ही धारणा या अधिकारी व कर्मचार्यांची आहे. मात्र, विभीषणाची निती वापरून या कलयुगात काम करताना ताक सुद्धा फुकून प्यावे लागत आहे ही खूप मोठी शोकांतिका आहे.
शासनाची पायरी चढणारा सहज म्हणून जातो शासनाचे काम, जाते लांब..किंवा कोणीही महसुल व पोलीसाची पायरी चढू नये बाबा! हे ऐकल्यावर एकच लक्षात येते की, महसुलखाते व पोलीस खाते भ्रष्टाचाराने बरबटलेले आहे का? जर असेल तर काही अधिकारी व कर्मचारी तुकाराम मुंडे सारखी भूमिका बजाविण्यासाठी पुढे येत असताना त्यांच्या पायाला आवर घालण्यासाठी काही समाजातील व याच खात्यातील मंडळी अतोनात प्रयत्न करीत असतात.
भ्रष्टाचार मुक्त व चाकोरीबद्ध शासनाचे काम करीत असलेल्या अधिकार्यांची नाहक बदनामी करणारी टोळी बारामतीत सक्रीय आहे. बदनामी का केली जाते, कशासाठी केली जाते हे सर्वसामान्य नागरीकांना न उलघडणारे सत्य आहे. बारामती विकासात्मक बारामती म्हणून संबोधली जाते. ज्या तालुक्याचा विकास होत असतो त्याठिकाणी सर्वच वस्तु, गरजा, जागांना चांगला भाव, दर्जा प्राप्त होत असतो त्यामुळे येथील लोकांचे राहणीमान उंचावत असते. त्याच जोडीला अवैध धंदे सुद्धा जोमाने चालतात हे कोणी ज्योतिषाने सांगण्याची गरज नाही. असे धंदे (सावकार, मटका, जुगार इ.) सर्वसामान्य नागरीकांच्या कुटुंबाला डोकेदुखी ठरतात त्यामुळे जनसामान्यातून सदरचे धंदे बंद करणेबाबत नागरीक पोलीसांकडे धाव घेत असतात. अशावेळी शासनाचे अधिकारी व कर्मचार्यांची जबाबदारी असते की, सदरचा बेकायदेशीर धंदा बंद करावा मात्र, काही अधिकारी स्वच्छ कारभार करून भ्रष्टाचार मुक्त करण्याचा प्रयत्न करीत असतात. हा प्रयत्न हानून पाडण्यासाठी खात्यातील चिरीमिरी घेणारी काही मंडळी भाया वर करून तयार असतात ते नाना प्रकारे खात्यातीलच अधिकार्याला त्रास देण्यासाठी युक्त्या शोधत असतात. आलेला अधिकारी कधी या खुर्चीतून धुम ठोकतो आणि माझी पाची बोटं तुपात असतील असे दिवास्वप्न तो पाहत असतो.
शासकीय सेवेत विभीषणाची निती वापरून सेवा करीत असताना अधिकार्यांवर आरोप प्रत्यारोप होत असतात ते संबंधित अधिकारी त्याचा स्वीकार सुद्धा करतात. मात्र, काही आरोप असे असतात की, त्याला काहीच अर्थ नसतो संबंधित तक्रारदार खालच्या तळाला जावून आरोप करून समाजातून, शासनाच्या खात्यातून विशेषत: कुटुंबातून कशी बदनामी होईल असे कृत्य काही मंडळी करण्यासाठी पुढे येत असतात. अशांना लागलीच लगाम घालणे गरजेचे आहे.
बिभीषणाच्या मृत्यूचा कोणत्याही ग्रंथात उल्लेख न आल्याने बिभीषण चिरंजीव समजला जातो. मात्र, नाहक बदनामीकारक आरोपामुळे संबंधित अधिकारी चिरंजीव तर लांबच सेवेत असतानाच त्याच्या भावना, इच्छाशक्ती व त्याच्या कृतीला तिलांजली दिली जात असेल तर ही खूप खेदाची बाब आहे.
आज समाजात सहज युवक वर्गात भ्रष्टाचाराबाबत विचारले असता, तो राग राग केल्याशिवाय राहत नाही. त्यास भयमुक्त, भ्रष्टाचारमुक्त भारत पाहिजे आहे. आज एकट्या तुकाराम मुंडे यांच्या पाठीशी अख्खा महाराष्ट्र आहे. प्रत्येक खात्यामध्ये तुकाराम मुंडे निर्माण होण्याची इच्छाशक्ती अधिकारी दाखवत असताना त्यांचे मानसिक खच्चीकरण करण्याचे काम होत आहे. अशा आरोपांना भिक न घालता या अधिकार्यांनी जोमाने काम करत रहावे समाजातील विभीषण युवक तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील यात तिळमात्र शंका नाही.