बारामती(वार्ताहर): ज्या आमराईचे नाव घेताच काहींच्या कपाळावर आट्या पडतात. मनात वेगवेगळ्या विचारांचे वादळ निर्माण होते अशा आमराईतील युवकांनी तातडीने शस्त्रक्रीया करावयास लागणार्या रूग्णाला रक्तदान करून आमराईतील रक्तच खराब म्हणणार्यांना एक प्रकारे सामाजिक कार्यातून चपराकच दिली.
रक्तदाते शरीरसौष्ठव प्रशिक्षक संतोष जगताप, सिद्धार्थ अहिवळे, बंटी डिकळे, सिद्धांत लांडगे, सोमनाथ कदम व शिवा तुपे या युवकांनी तातडीने पुढाकार घेत रक्तदान करून आरोग्य अडचणीत असणार्याची मदत केली.
गिरिराज हॉस्पीटलमध्ये दत्तात्रय चर्तुभूज पाटील (रा.वरवडे, ता.म्हाडा, जि.सोलापूर) हे उपचारासाठी आले असता, डॉक्टरांनी तातडीने बायपास शस्त्रक्रीया तात्काळ करावी लागेल त्यासाठी आठ रक्ताच्या बाटल्या लागतील असे रूग्णासोबत त्यांचा मुलगा भाऊ पाटील यांना सांगितले.
धर्मसंकटात सापडलेला मुलगा वडिलांच्या उपचार तातडीने व्हावे म्हणून जवळच्या गिरिजा ब्लड बँकेत धाव घेतली. रक्तपुरवठा कमी असल्याने चार रक्तदात्यांची मागणी ब्लड बँकेत करण्यात आली. नवख्या गावात कोणाशी ओळख नव्हती. पण म्हणतात ना, देव दगडात नसून तो जनमाणसात आहे त्याचा प्रत्यय भाऊ पाटलांना आला.
या दरम्यान भाऊ पाटील यांची सिद्धार्थ अहिवळे यांची गाठ पडली आणि अडचण मांडली. सिद्धार्थने वेळ न घालवता सामाजिक कार्यकर्ते व शरिरसौष्ठव प्रशिक्षक संतोष जगताप यांना सांगितले असता वरील लोकांनी क्षणाचा विलंब न लावता रक्तदान केले आणि दत्तात्रय पाटील यांचे शस्त्रक्रियेला हातभार लावला.
रक्तदात्यांपैकी कोणीही रूग्णाला ओळखत नव्हते. जात,पात,धर्म,वंश या कशाचाही विचार न करता माणुसकीच्या नात्याने माणूस धर्म पाहुन सर्व धावले. या कृतीमुळे पाटील कुटुंब भावनिक झाले होे. आभारासाठी पाटील कुटुंबियांचे हाथ उठले होते ते हात धरून याच युवकांनी आभार मानले.