विशेष वाटलं ना दोन्ही नाव एकत्र बघून तसं तर दूरदूर पर्यंत या दोन्ही नावांचा एकत्र काहीएक संबंध नाही. किंवा कुणी ती एकत्र घेतल्याचं ऐकवीत पण नाही. पण हे पूर्णपणे माझे विचार आहेत. सहमत त्याच होतील , ज्यांनी हे अनुभवले आहे. “थप्पड” पिक्चर पाहिल्यानंतर चा अनुभव माझ्यामते यापेक्षा काही वेगळा नव्हता.
एकदा काय होतं ध्रुवबाळ जातो वडिलांच्या मांडीवर “हक्काने” बसायला. आणि तोच “हक्क” त्याच्याकडून हिरावला जातो. पुढची गोष्ट सर्वांना माहिती आहे आणि तो हक्क मिळवण्यासाठी तो घोर तपश्चर्या करायला लागतो.. हक्क म्हणजे काय हो “अढळ स्थान “. जिथून त्याला कोणीही उठवणार नाही. मला वाटते बऱ्याच जणींच्या लक्षात आलं असेल. जणांच्या नाही म्हणाले मी जणींच्या… कारण ही गोष्ट आधुनिक ध्रुव बाळाची म्हणजेच समस्त स्त्री वर्गाची आहे.
हो मी समस्त च म्हणाले. कारण फक्त हातांच्या बोटावर मोजण्याइतक्या जणीकडे आत्ता हे “अढळ स्थान” असणार आहे. जिथून तिला कोणीही जा बोलणार नाही. मी बोलते हे पटतंय ना? कारण प्रत्येकीच्या आयुष्यात एकदा तरी, एक प्रसंग तरी असा आला असेल कि ती संभ्रमित झाली असेल.
माझं नक्की घर कोणतं? ज्या घरात मी लहानाची मोठी झाले ते? की ज्या घरात माझं लग्न लावून दिलं ते घर? माझ्या पगारातून ज्या घराचे हप्ते जातात ते घर? की एवढा सुंदर घर बनवण्यासाठी मी माझं करिअर सोडून घरात बसले ते घर? निम्म्यापेक्षा जास्त हप्ता भरायला मी मदत करून पण त्याने स्वतःच्या नावावर घर केलं ते घर? विणकाम ,भरतकाम सारख्या माझ्या छंदांना प्रोफेशनल रूप देऊन त्याच्यातून उभ्या केलेल्या पैशातून घेतलेलं. ते घर? त्याला मानसिक आधार मिळावा म्हणून माझं सर्वस्व सोडून मी ज्या घरात हाऊस वाइफ झाले ते घर? होम लोन चा इंटरेस्ट रेट कमी बसावा म्हणून माझ्या नावावर फक्त कागदोपत्री केलेलं ते घर?
घरकुल आवास योजनेत बसाव म्हणून त्याच्यासाठी नगरपालिकेत 500 हेलपाटे घातले ते घर? की मी ज्या बॅंकेत काम करते, तिथल्या कामगारांना होम लोन चा इंटरेस्ट रेट कमी पडतो म्हणून माझ्या नावावर घेतलेल्या होम लोनचे हप्ते मी माझ्या पगारातून फेडते. ते घर? शिलाई मशीन वरती , रात्रंदिवस शिलाई करून गळक्या पत्र्या ऐवजी मी सिमेंट पत्रे टाकले. ते घर? मी आयटी कंपनीत काम करून त्याच्या पेक्षा जास्त पगार मिळून सुद्धा, नवीन घराच्या पाटीवर माझं नाव अगोदर टाकताना कचरत होता तो. ते घर? मेस चे डबे बनवून देऊन, महिन्याला काडी काडी ने मी डागडुजी केलेल्या वडिलोपार्जित वाड्याला राहण्या पुरता दिलेला आधार. ते घर? प्रसंगी मी स्वतःचे दागिने गहाण ठेवून घराचं बांधकाम अखंडित चालू राहण्यासाठी केलेली धडपड. ते घर?
लेकीच्या लग्नासाठी ,मुलाच्या शिक्षणासाठी साठवलेले पैसे अचानक नैसर्गिक आपत्तीमुळे आलेल्या संकटासाठी घरावर खर्च केले.ते घर? सजावटीसाठी इंटेरिअर डेकोरेटर च्या हातात न देता,माझी स्वतःची कल्पकता आणि क्रिएटिविटी वापरून सजवलेलं. ते घर? लग्न झाल्यापासून ननंदा ची लग्न. बाळंतपणा दिराचे शिक्षण, लग्न, जबाबदाऱ्या समर्थपणे केल्यामुळे घराकडे माझे दुर्लक्ष झाल्याने पावसाळ्यात गळणारे. ते घर? की स्वतःच्या भावकी मध्ये मोठेपणा मिरवता यावा म्हणून, माझ्या वडिलांकडून भरमसाठ हुंडा घेऊन बांधलेलं ते घर? स्वतःच्या भावाशी भांडून वडिलोपार्जित मालमत्तेतून हिसकाऊन घेतलेल्या संपत्तीतील ते घर? ज्या हाताला राखी बांधली त्याच् हातातून हक्कसोड चे पैसे घेतले, त्या पैशाचा घेतलेला फ्लॅट. ते घर? आणि यापैकी काहीच न करता, फक्त घरातल्या रोजच्या खर्चात काटकसर करून , वर्षानुवर्ष काडी काडी ने संसार करून जमवलेल्या पैशातून घेतलेलं. ते घर?
नक्की कोणतं घर तिच? घरावरती खरंच हक्क असतो का हो तिचा? कायद्याच्या गोष्टी सोडून बोला.. कारण रोज जेव्हा छोट्या-मोठ्या चुकांवर तिला घर सोडून जा म्हणून सुनावले जाते. मग ते “गेट आऊट” असो किंवा “जा तू तुझ्या बापाच्या घरी” दोन्हींचा अर्थ एकच.
तीस ते चाळीस वर्ष जरी “आपले घर” म्हणुन तिने संसार केला तरीही तिला खरच ते घर आपलं मानते का? की उठता बसता तिला सुनावले जाते “माझ आणि माझ्या पोरांचा मी पाहतो तू तुझं बघ” शेवटी काय घर फक्त आर्थिक बाजूंनी बनत नाही, त्यासाठी दुसरी बाजू पण तितकीच महत्त्वाची. मग ती मानसिक असेल, कौटुंबिक असेल, जिव्हाळ्याची असेल, प्रेमाची असेल ,आपुलकीची असेल, नातेसंबंधाची असेल किंवा त्यागाची.
शेवटी घर हे दोन्ही बाजूंनी च बनणार आहे. मग ते त्याचे किंवा तिचे एकटे कुणाचे कसे काय बरे असू शकेल?(थोडा वेळ कायद्याच्या गोष्टी सोडा हो) त्यामुळे कोणीच त्याने/ तिने रागात, भांडणात, टेन्शनमध्ये कधीच “माझे घर” असे एकेरी उल्लेख नाही करायचा. एकदाही नाही… आणि कधीच नाही… कारण ते नेहमीच “आपलेच” असणार आहे. आता, हे न बोलणे, जितकी “बोलणाऱ्याची” जबाबदारी आहे तितकीच “ऐकणाऱ्याने” पण ते ऐकून घेऊ नये. पण हे सर्व थांबवायची सुरुवात कुठून करायची हे ज्याचे त्याने ठरवावे..बोलून दाखवनाऱ्याने पण आणि ऐकून घेणाऱ्याने पण…
शेवटी घर दोघांचं आहे….
© सौ अभिजिता नवनाथ जगताप
abhijita.jagtap@gmail.com
खरच, आपल्यापैकी बर्याच सखी या सर्व परीस्थीतींना सामोरे जातात. आपले स्थान पक्के करयाची गरज आहे. बदलत्या काळाची गरज लक्शात घेता आज स्री पुरूष समानता असली तरी अस्तीत्वात मात्र दिसून येत नाही. स्री कोठे कमी पडते तेच समजत नाही. हा भेदभाव कायम राहनार का?
yes its true..