साहेबांनी ज्या महिलेच्या हाती पाळण्याची दोरी होती, त्या हाती झेंड्याची दोरी दिली – शहराध्यक्ष, जय पाटील

डॉ.पी.ए.इनामदार एकता इंग्लिश मिडियम स्कुल कॉम्प्युटर लॅबचे उद्घाटन संपन्न

बारामती(वार्ताहर): पवार साहेबांनी ज्या महिलेच्या हाती पाळण्याची दोरी होती, त्या हाती झेंड्याची दोरी देऊन त्यांना मानसन्मान दिला असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे बारामती शहर अध्यक्ष जय पाटील यांनी केले.

माजी केंद्रीय कृषिमंत्री, लोकनेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या 82 व्या वाढदिवसानिमित्त शिक्षणमहर्षि व विद्यमान मुस्लिम को.ऑप बँक पुणेचे चेअरमन डॉ.पी.ए.इनामदार यांनी डॉ.पी.ए. इनामदार एकता इंग्लिश मिडियम स्कुल शाळेस 25 कॉम्प्युटरची लॅब उपलब्ध करून दिली. त्याप्रसंगी श्री. पाटील बोलत होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बारामती सहकारी बँकेचे चेअरमन सचिन सातव होते. यावेळी मुस्लिम बँकेचे संचालक व पी.ए.इनामदार यांचे सुपूत्र तन्वीर इनामदार, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष अविनाश बांदल, बारामती बँकेचे ज्येष्ठ संचालक गिरीष कुलकर्णी, माजी नगरसेवक सत्यव्रत काळे, अनिल कदम, राष्ट्रवादी कॉंग्रेस शहरचे कार्याध्यक्ष विशाल जाधव, सेवादलाचे शहराध्यक्ष ऍड.धिरज लालबिगे, व्यापारी महासंघाचे फकरूशेठ बोहरी, बाळासाहेब चव्हाण, बारामती इंडस्ट्रीयल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार, शिक्षण मंडळाचे माजी सभापती हाजी कमरुद्दीन सय्यद इ. मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना श्री.पाटील म्हणाले की, पवार साहेबांनी महिलांना 50 टक्के आरक्षण देवून पुरूषांच्या बरोबरीने काम करण्याची संधी दिली. संरक्षण मंत्री असताना सैन्य दलात महिलांना सहभागी केले. फुले, शाहु व आंबेडकरांचे विचार रूजविण्याचे काम पवार साहेब करीत आलेले आहेत. तळागळातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून शिक्षणाची दारे उघडली. विद्या प्रतिष्ठान सारखी संस्था उभी केली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

डॉ.पी.ए.इनामदार यांनी 25 कॉम्प्युटर उपलब्ध करून दिले ही खुप कौतुकाची बाब आहे. पवार साहेब व पी.ए.इनामदार या दोन्ही व्यक्ती आदर्श आहेत. पत्र्याच्या छतामध्ये सुरू केलेली शाळा सुंदर इमारतीत उभी राहिली आहे. भविष्यात येथील विद्यार्थ्यांच्या हातून चांगले काम होईल असेही त्यांची इच्छा व्यक्त केली. शाळेचे शिक्षण, इमारतीचे भरभरून कौतुक केले.

शिक्षण महर्षी श्री.पी.ए. इनामदार हे नेहमीच बारामतीकरांना मदत करीत असतात आदरणीय साहेब व दादांशी त्यांचे घनिष्ठ संबंध असुन बारामतीमध्ये शैक्षणिक कामाकरीता दिलेले संगणक निश्र्चित विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत होईल असे सचिन सातव यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना सांगितले.

गिरीष कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त करताना आलताफ सय्यद यांनी राबवलेल्या उपक्रमाबद्दल गौरवउदगार काढले.

आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत व सत्कार मुस्लिम बँकेचे संचालक व शाळेचे अध्यक्ष आलताफ सय्यद व शाळेचे सचिव व सहारा फौंडेशनचे अध्यक्ष परवेज सय्यद यांनी कलेले होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक परवेज सय्यद यांनी शाळेच्या कामकाजा संदर्भात सविस्तर माहिती दिली. सुत्रसंचालन आलताफ सय्यद यांनी केले तर शेवटी आभार शाळेचे उपाध्यक्ष सुबहान कुरैशी यांनी मानले.

यावेळी शफिक सय्यद, शाहिद सय्यद, निसार शेख, हाजी रशिद बागवान, अखलाज सय्यद, राजु शेख, असिफ शेख, जयेंद्र ढवाण पाटील, सलिम तांबोळी, हाजी वसिम कुरेशी, अफरोज मुजावर, सिकंदर तांबोळी, राजु पठाण काटेवाडी, अलिशान सय्यद कोर्‍हाळे बु।। बहुसंख्य पालक, विदयार्थी व शिक्षक वर्ग उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!