बारामती(वार्ताहर): बारामती इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चर्स (बीआयएम) असोसिएशनची आग्रही मागणी व पाठपुराव्यास एसटी प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला व काही वर्षापासून बंद बस सेवा पुन्हा चालू करण्यात आली असून एमआयडीसीतील कामगार विद्यार्थी व परिसरातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार यांनी केले आहे.
एमआयडीसीसाठी नियमित एसटी बससेवेचा शुभारंभ करण्यात आला त्या प्रसंगी श्री.जामदार बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळचे पुणे विभागीय नियंत्रक रमाकांत गायकवाड, बीएमआयचे सचिव अनंत अवचट, सदस्य महादेव गायकवाड कॉटनकिंगचे खंडोजी गायकवाड, टेक्स्टाईल पार्कचे अनिल वाघ, उद्योजक हरीश खाडे, महादेव शिंदे, नितीन जामदार, सतीश किर्दक, शरद शिंगाडे, शिवराज जामदार, पंडित रणदिवे, संदीप जगताप, आगारप्रमुख , कर्मचारी, चालक वाहक, प्रवासी आदींच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून एसटी बस एमआयडीसी कडे रवाना करण्यात आली.
श्री.जामदार मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, एसटी सेवा बंद असल्याने उद्योजक, कामगार, विद्यार्थी व परिसरातील नागरिकांचे प्रचंड हाल होत होते. अनेक रिक्षाचालक व खाजगी वाहतूकदार प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारत होते. विद्यार्थिनी व महिलांच्या छेडछाडीच्या घटना वाढत होत्या. असुरक्षित व अवैद्य वाहतुकीमुळे अपघातांचे घटना वाढत चालल्या होत्या. एमआयडीसीतील कामगार व नागरिकांची ही समस्या ओळखून बारामती इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनने एसटी प्रशासनाकडे नियमित बस सेवा सुरू करण्यासाठी आग्रह मागणी करून सातत्याने पाठपुरावा केल्याची माहिती धनंजय जामदार यांनी दिली.
बारामती एमआयडीसी बारामती असे दिवसभरात जवळपास 35 फेर्या करण्यात येणार असून आवश्यकतेनुसार यात वाढ करण्यात येईल अशी ग्वाही रमाकांत गायकवाड यांनी यावेळी दिली.