बारामती(वार्ताहर): अरूण बोंगिरवार पुरस्कार, अमेरिकेचा लीडरशिप इन कम्युनिटी पोलिसिंग अवार्ड, महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार तर केंद्रीय गृहमंत्र्यातर्फे विशेष ऑपरेशन अशा विविध पुरस्काराने सन्मानीत असणारे अंकित गोयल यांनी पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षकपदी नुकतेच रूजू झाले आहेत.
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकपदाची सूत्रे स्वीकारण्यापूर्वी गोयल गडचिरोली पोलीस दलात अधीक्षक होते. नक्षलवादी क्षेत्रात जीवाची बाजी लावत धडाकेबाज कामगिरी करून अनेक नक्षलींना कंठस्नान घातले. या कार्याबद्दल त्यांना राज्याच्या प्रशासकीय सेवेत प्रतिष्ठेचा मानला जाणारा अरूण बोंगिरवार पुरस्कार प्रदान करण्यात आला. विशेष म्हणजे नक्षलवादी चळवळीतील अनेकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी विविध उपक्रम राबविले.
सामाजिक भान जपत 16 आत्मसमर्पियांचा सामुहिक विवाह लावून दिला. दुर्गम भागातील लोकांना विविध सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी पोलीस दादाची खिडकी हा उपक्रम सुरू केला. या उपक्रमाची दखल घेऊन अमेरिकेतील व्हर्जिनिया युनिव्हर्सिटीने अंकित गोयल यांना लीडरशिप इन कम्युनिटी पोलिसिंग हा अवार्ड दिला. दैनिक लोकमतने महाराष्ट्रीयन ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानीत केले. केंद्रीय गृहमंत्र्यांचे 2022 सालचे विशेष ऑपरेशन पदक सुद्धा जाहीर करण्यात आले.
आगामी सर्व निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गोयल यांना जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.