एरवी ज्यांच्याकडे देवदूत म्हणून पाहिले जाते.. तेच एका तीन वर्षाच्या अरहतचे काळ ठरले..

बारामती(वार्ताहर): येथील नामांकित गिरीराज हॉस्पीटल, स्पर्श हॉस्पीटल, चिरायु हॉस्पीटल व श्रीपाल हॉस्पीटल या हॉस्पीटलचे मालक/चालक डॉक्टरांकडे एरवी देवदूत म्हणून पाहिले जाते तेच एका तीन वर्षाच्या अरहत प्रमोद थोरातचे काळ ठरत असतील तर ही खूप मोठी विकसीत झालेल्या बारामतीतील वैद्यकीय क्षेत्रातील शोकांतिका आहे. वरील हॉस्पीटलच्या डॉक्टरांनी उपचार नाकारल्याने अरहतचा मृत्यू झाला असल्याने डॉक्टरांवर व बंदोबस्तास असणार्‍या पोलीसांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

शुभांगी प्रकाश कांबळे (वय-37, रा.सटवाजीनगर, बारामती) यांनी बारामती शहर पोलीस स्टेशनला दाखल केलेल्या फिर्यादीनुसार अरहच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या संबंधित दुचाकी वाहन चालक संकेत प्रकाश खळदकर (रा.नानगाव, ता.दौंड, जि.पुणे) याच्यावर भा.द.वि.कलम 1860 अन्वये 279, 337,338 व 304-ए व महाराष्ट्र मोटार वाहन नियम,1989 अन्वये 184 व 177 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत बारामती शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार सविस्तर माहिती अशी की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक पुतळा याठिकाणी बारामती बौद्ध युवक संघटनेतर्फे बौद्ध समाजाचा मेळावा घेण्यात आला होता. या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी फिर्यादी शुभांगी, अरहत, अरहतची आई प्रिती व फिर्यादीची मुलगी मानसी बारामती बसस्थानकाचा चौक ओलांडून इंदापूर रोडलगत असणार्‍या जय शिवम हॉटेल समोरून पुढे चालले असता, फिर्यादी शुभांगी यांनी अरहतचा हात धरला होता. कार्यक्रमामुळे रस्ते लोखंडी अँगलने बंद करण्यात आले होते. वरील सर्वांनी सदरचा अँगल ओलांडून कार्यक्रमाच्या दिशेने निघाले असता, मागील बाजुने भरधावे वेगाने, निष्काळजीपणे कसालाही विचार न करता दुचाकी चालक संकेत खळदकर याने सदरचे अँगलला जबर ठोस दिली. या ठोसेचा प्रथम दणका फिर्यादी शुभांगी यांच्या डाव्या पायाला लागला व नंतर अँगल उडून अरहतला लागला यामध्ये अरहत उडून पडला. अरहतच्या डोक्यातून रक्तस्त्राव वाहु लागला तरी सुद्धा तो शुद्धीवर होता. फिर्यादी शुभांगी, विशाल राजेंद्र सोनवणे व अरहतची आई प्रिती यांनी वरील हॉस्पीटलला पोटतिडकीने विनंती करीत बाळावर उपचार करणेबाबत सांगितले. ऍक्सिडेंटचे पेशंट घेत नाही म्हणून सर्वांनी हात झटकले. रूग्णवाहिका सुद्धा उपलब्ध करून दिली नाही. तसेच दुचाकीवर अरहतला देवकाते हॉस्पीटल येथे घेऊन गेले असता, डॉक्टरांनी तपासणीस सुरूवात केली असता, बाळाला आणण्यास उशिर झाला असे सांगून अरहता मृत्यू घोषित केला असे फिर्यादी शुभांगी यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे.

प्रत्येक हॉस्पीटलला रूग्ण तपासणीचे हक्क व कर्तव्य दिलेले आहेत. अपघात किंवा इतर कारणांमुळे रक्तस्त्राव होत असल्यास सर्वप्रथम तो रक्तस्त्राव थांबवावा लागतो. धमणीतून रक्तस्त्राव होत असेल, तर रक्ताच्या चिळकांड्या उडतात, असा रक्तस्त्राव न थांबल्यास मृत्यू ओढवू शकतो. शिरेतून होणारा रक्तप्रवाह संथ असतो. तसेच केशवाहिन्यांतील होणारा रक्तप्रवाह थेंबथेंब गळत राहतो. पुष्कळ जखमांमधील रक्तस्राव जखमेवर बँडेज घट्ट बांधून थांबविता येतो. हाच प्राथमिक उपचार अरहतच्या घटनेत जर वरीलपैकी कोणत्याही हॉस्पीटलने व तेथील डॉक्टरांनी दिला असता तर याच डॉक्टरांवर आरोप करणार्‍या मंडळींनी डोक्यावर घेऊन नाचले असते. अपघातातील जखमींना कमीत कमी वेळेत म्हणजे गोल्डन अवरमध्ये हॉस्पिटलमध्ये नेणे आवश्यक असते. अरहतला हाकेच्या अंतरावर असणार्‍या गिरीराज व स्पर्श हॉस्पीटलमध्ये नेले होते मात्र, प्राथमिक तातडीचा उपचार न मिळाल्याने अरहतला प्राण गमवावे लागले ही खूप खेदाची बाब आहे.

अनेकदा रस्ते अपघातात जखमी झालेल्यांना आपल्या गाडीतून दवाखान्यापर्यंत पोहचवणे, किंवा तात्काळ जागेवर औषधोपचार, ऍम्ब्यूलन्स बोलवून जखमींना तातडीने हॉस्पीटलमध्ये हलवण्यास मदत करतांनाची अनेक उदाहरणे आहेत. मदत करणार्‍यांमध्ये अपघात झाल्यावर काय करायचे याबाबत जनजागृती झालेली आहे मात्र, मदत करणार्‍याचे कर्तव्य जर असे डॉक्टर व हॉस्पीटल धुळीला मिळवीत असतील तर दोष कोणाचा? हा प्रश्र्न सर्वसामान्य नागरीकांना पडलेला आहे. सध्या अनेक डॉक्टरांनी रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा हे ब्रिदवाक्य विसरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

हॉस्पीटल उभारताना विविध परवानग्या घेतल्या जातात, यामध्ये महत्वाची परवानगी म्हणजे हायवे, मुख्य रस्त्याच्या लगत सर्वसोयीयुक्त जागा असेल तर त्याठिकाणी संबंधित विभाग तातडीने परवानगी देते. त्याचा उद्देशच असतो, तातडीची सेवा संबंधित रूग्णास मिळाल्यास त्याचे प्राण वाचेल. मात्र, परवानग्याचा उद्देश कागदावरच राहिलेला असल्याचे या घटनेवरून दिसत आहे.

ज्याप्रमाणे अरहत थोरात या तीन वर्षाच्या बालकाच्या मृत्यूस कारणीभूत असणार्‍या वाहन चालक संकेत खळदकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला त्याचप्रमाणे प्राथमिक उपचार न देणार्‍या हॉस्पीटल व तेथील डॉक्टरांवर गुन्हा दाखल होण्यासाठी काही सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संघटना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत. जर या हॉस्पीटल धारकांना दिलेल्या परवानग्यामधील अटी व शर्तीला अधिन राहुन सेवा देत नसेल व डॉक्टरांनी रूग्ण सेवेबाबत घेतलेल्या प्रतिज्ञेचे पालन करता येत नसेल तर त्यांनी आपले रस्त्याकडेला असलेल्या हॉस्पीटलचे बस्तान उठवून दुसरीकडे स्थलांतर करण्याची गरज आहे अशीही मागणी नागरीकांमधून होत आहे. जर एवढे होऊनही ते त्यांचे बस्तान स्थलांतर करीत नसतील तर सर्वसामान्य नागरीक त्यांचे बस्तान स्थलांतर केल्याशिवाय राहणार नाही असेही काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

या व्यवस्थेच्या निष्काळजीपणामुळे एका कुटुंबातील बाळ मृत्यूमुखी पडले आहे. विशेष या कुटुंबातील व्यक्तींनी कायदा हातात घेतला नाही. शांत व संयमाने आज या आघाताचा सामना करीत आहेत. डॉक्टरांवर कोणताही हल्ला केला नाही. हल्ला केला असता तर डॉक्टरांच्या बाजुने संरक्षण कायदा आहे मात्र, आज अरहतचा डॉक्टरांच्या निकृष्ठ सेवेमुळे मृत्यू झाला याबाबत अजुन भविष्यात खुप झगडावे लागेल हे त्रीकाळ सत्य आहे.

दि.14 ऑक्टोबर 2022 रोजी बारामतीचे उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांना अरहतचा झालेल्या मृत्यूच्या ठिकाणी पोलीस नव्हते त्यामुळे संबंधित बंदोबस्ताला असणार्‍या पोलीसांवर कारवाई करण्याची मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे. जर कारवाई न झाल्यास उपविभागीय कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अनिकेत मोहिते, शुभांगी कांबळे, प्रमोद थोरात इ. उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!