हजरत मोहम्मद पैगंबर(स.) यांनी सांगितले की, संयम आणि आज्ञापालन करणारा इस्लाम आहे. भुकेल्यांना अन्नदान करणे, परिचित असो किंवा अपरिचित सर्वांचे प्रेमाने स्वागत करणे हाच इस्लामातील सर्वोत्कृष्ठ भाग आहे. एकाधिकार किंवा मक्तेदारी हा गुन्हा इस्लाममध्ये ठरविलेला आहे. सर्व धर्मात नम्रता हा गुण असतो, तो गुण इस्लाम मध्ये विशेष गुण मानला जातो. एखादा व्यक्ती पापी आहे तो समाजात राहुन अवगुण, द्वेष, मत्सर पसरवतो हे माहिती असुनही त्याला साथ देणारे जर त्यांचे अनुकरण करीत असतील तर त्याने इस्लामचा त्याग केला असे इस्लाममध्ये सांगितले आहे.
संपूर्ण जगात हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती साजरी केली जाते. दरवर्षीप्रमाणे बारामतीत सुद्धा जयंती साजरी करण्यात आली. बारामतीत जयंतीत जोष, उल्हास दिसून आला. मात्र, शिस्त कुठे दिसून आली नाही. प्रथम तर जयंती साजरी कशी करावी याबाबत कोणाच्यात मेळ नाही. जयंती उत्सव समिती नाही त्यामुळे ऐकावे जनाचे करावे मनाचे अशी अवस्था होऊन बसली आहे. जो-तो आपआपले विचाराने मिरवणुकीत येत आहे व मनमानेल त्याप्रमाणे वागत आहे.
यावर्षी तर कसबा, गुनवडी चौकात डि.जे.ने तर सर्वांचे हृदयच हलवून सोडले. कर्कश आवाजामुळे बरं झालं वृद्ध, लहान मुलांचे हृदय बंद पडले नाही. मा.सर्वोच्च न्यायालयाने डी.जे.बाबत जी बंदी आणलेली आहे ती या चौकात मिरवणुकीचे वेळी थांबल्यानंतर कळाले. आवाजाचे झोन निर्माण केलेले आहेत मात्र, त्यादिवशी सर्व मर्यादा ओलांडून डी.जे. वाजत होते.
डी.जे. चौका-चौकात असतील असे वाटले, मात्र, या डी.जेंनी कहरच केला मिरवणुकीत सुद्धा पाठीमागे डि.जे. लावून अक्षरश: इस्लामच्या नावाला काळीमा फासली जाईल अशी गाणी लावून इस्लामचा भंग केला यावेळी मात्र, मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या नसतील. यावेळी सर्वांचे कान, नाक व डोळे बंद होते की काय असा प्रश्र्न पडत आहे.
मिरवणुकीत सर्वात पुढे विविध मशिदींचे धर्मगुरू होते. सुरूवातीला एका रांगेत मिरवणुकी निघाली सर्वांनी एकसंघ व शिस्तीचे दर्शन दिले. मात्र, पुढे गेल्यानंतर प्रत्येकाच्या मनात जो अहंकार, स्वार्थ लपलेला होता तो पुढे आला आणि ‘मी पुढे का तू पुढे’ अशी स्पर्धा पहावयास मिळाली. थोरा मोठ्यांचा धाक समाजावर राहिलेला नाही असे या मिरवणुकीतून दिसून आले.
मिरवणुकीत वृद्ध, लहान मुले व मुली असतात म्हणून चौका-चौकात त्यांना पाणी व खाऊ ठेवलेला असतो. या वाटपावर मोठ्यांनी डल्ला मारला, बघता..बघता या मोठ्यांनी आणलेल्या पिशव्या भरल्या तरी सुद्धा काय घेऊ, काय नाही असे करणार्यांमध्ये महिला सुद्धा मागे राहिल्या नाहीत ही खुप मोठी शोकांतिका आहे. या वाटपामुळे संपूर्ण मिरवणुक अस्तव्यस्त होताना दिसली. समाजातील कित्येक थोरा-मोठ्यांनी ज्या ठिकाणाहून मिरणुकीचा प्रारंभ होतो त्या ठिकाणी विविध सामाजिक संस्था, मंडळांनी एकाच ठिकाणी आपआपले स्टॉल उभे करून त्यावर संस्थेचे बॅनर लावून काय वाटप करायचे ते केले पाहिजे. जयंतीच्या मिरवणुकीत समाज बांधवांनी ऐकले तर खरंच ह.मोहम्मद पैगंबरांचे विचार आत्मसात केल्यासारखे होईल.
समाजात राजकारण घुसलं की, त्या समाजाचे बारा वाजले म्हणून समजावे. राजकारणी लोकांना समाज लागतो, त्या समाजात कसे वाद-विवाद, एकमेकांचे विरोध निर्माण होतील आणि माझा स्वार्थ साधेल हे पाहणारी मंडळी आहेत. त्यावेळी समाजाची नितीमूल्य समाजाचे विचार अडगळीत ठेवले जातात. फक्त आणि फक्त त्या राजकारणी लोकांचे गुण गायिले जातात. मग त्या राजकीय व्यक्तीने समाजासाठी काहीही केलेले नसले तरी चालेल अशी अवस्था प्रत्येक समाजात होऊन बसली आहे.
येणार्या काळात किमान हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती तरी इस्लामच्या शिकवणीनुसार काढावी. मिरवणुकीनंतर ज्या कोणा संस्था, मंडळांना नंगानाच करावयाचा आहे त्यांनी खुशाल करावा त्यास यापुढे निर्माण होणारी उत्सव समिती आडकाठी घालणार नाही.