विद्या प्रतिष्ठानच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन
बारामती(वार्ताहर): 16 ऑक्टोबर रोजी विद्या प्रतिष्ठान पन्नास वर्षाचा टप्पा पूर्ण करीत आहे. सुवर्ण महोत्सवानिमित्त दि.15 ऑक्टोबर रोजी सांस्कृतिक कार्यक्र तर 16 ऑक्टोबर रोजी सेंटर ऑफ एक्स्लेन्स् या इमारतीचा भूमिपूजन समारंभ विविध मान्यवरांच्या उपस्थित होणार आहे.
16 ऑक्टोबर 1972 रोजी विद्या प्रतिष्ठानच्या वतीने इंग्रजी शाळेची उणीव लक्षात घेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी विनोदकुमार गुजर, द.रा.उंडे, अप्पासाहेब जाधव, खुशालचंद छाजेड, डॉ.एम.आर.शहा, विठ्ठलशेठ मणीयार यांच्या मदतीने बाल विकास मंदीर शाळा म्हणजे सध्याची विनोदकुमार गुजर बाल विकास मंदीर शाळेची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर शैक्षणिक संस्थेचा वटवृक्ष वाढत गेला.
संस्थेत 16504 मुले व 13887 मुली असे एकूण 30391 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना तब्बल 1179 शिक्षक व प्राध्यापक मार्गदर्शन करीत असून 584 शिक्षकेतर कर्मचारी संस्थेमध्ये कार्यरत आहेत. संस्थेमध्ये 17 शाळा व 12 महाविद्यालय असून मराठी व इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिले जाते.
शालेय स्तरावर सीबीएसई, आयसीएसई, एसएससी व महाविद्यालयीन स्तरावर कला, विज्ञान, वाणिज्य, जैवतंत्रज्ञान, अभियांत्रिकी, विधी, संगणक, एम.बी.ए, माहिती व तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन, स्थापत्य, यांत्रिकी, कृषी जैवतंत्रज्ञान, फुड टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनइरिंगतर्फे काही अभ्यासक्रम चालविले जातात.
स्कील डेव्हलपमेंट व व्यक्तिमत्व विकासासाठीही उपक्रम राबविले जातात. कँपस इंटरव्यूच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उत्तम नोकरीची संधी उपलब्ध करुन दिली जाते. पोलिस भरतीसाठी वर्ग व महाराष्ट्र लोकसेवा व केंद्रीय लोकसेवा आयोग तसेच नीट,जेईई व सीईटीच्या परिक्षांसाठी मार्गदर्शन केले जाते. या माध्यमातून विद्यार्थ्यांनी यश प्राप्त करुन सरकारी सेवेत ते रूजू झाले आहेत. विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तुंग यश प्राप्त केले आहे.
अभ्यासक्रम शुल्काव्यतिरिक्त कोणतेही अतिरिक्त शुल्क किंवा देणगीची विद्या प्रतिष्ठानची परंपरा नाही. गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी मदत केली जाते. प्राध्यापकांसह कर्मचारी गुणवत्तावृध्दीसाठी पीएच.डी. व संशोधनासाठी संस्था सातत्याने प्रोत्साहन दिले. विद्या प्रतिष्ठानचा परिसर वायफाय असून सर्व अत्याधुनिक सोयीसुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
पुणे शहर, बारामती, सोमेश्वर, सुपे, इंदापूर, भोर, ठाणे या ठिकाणी विद्या प्रतिष्ठानच्या शाळा महाविद्यालय कार्यरत आहेत. 29 शाखांमार्फत विविध शिक्षण अभ्यासक्रमांची दालने खुली असून केजी ते पीजी पर्यंत विद्यार्थी संस्थेत शिक्षण घेऊ शकतात.