बारामती(वार्ताहर): नव्याने सुरू झालेल्या आर्टिफिशइल इंटेलिजन्स्च्या माध्यमातून युवा उद्योजकांचे तांत्रिक ज्ञान व विचारांची क्षमता लक्षात घेऊन विशेष सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन शरयू उद्योग समूहाचे कार्यकारी संचालक युगेंद्र पवार यांनी केले.
बारामती इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनने उद्योजक संवाद अभियानांतर्गत बारामती एमआयडीसी व परिसरातील उद्योजकांसमवेत संवाद साधण्यासाठी युवा उद्योजक युगेंद्र पवार यांना निमंत्रित केले त्यावेळी श्री.पवार बोलत होते.
श्री.पवार पुढे बोलताना म्हणाले की, बारामती एमआयडीसी व परिसरात युवा उद्योजकांची संख्या लक्षणीय आहे. आर्टिफिशइल इंटेलिजन्स्च्या माध्यमातून उच्च तंत्रज्ञानाची ओळख, उपलब्धता व प्रत्यक्ष वापराबाबत सर्वतोपरी युवा उद्योजकांना सहकार्य केले जाईल. बारामती इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनने यासाठी पुढाकार घ्यावा असेही त्यांनी सांगितले.
युगेंद्र पवार यांनी उपस्थित प्रत्येक उद्योजकाबरोबर व्यक्तिगत संवाद साधत परिचय करून घेतला. प्रत्येकाच्या उद्योगाची बारकाईने माहिती घेत त्या व्यवसायातील आव्हाने व संधी बाबत सखोल चर्चा करून मार्गदर्शन केले.
धनंजय जामदार मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, बारामती एमआयडीसी व तालुक्यात आता नवीन पिढीतील अनेक उच्च शिक्षित युवक अतिशय खंबीरपणे उद्योग क्षेत्रात पदार्पण करत असून त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास त्यांचे भवितव्य अत्यंत उज्वल आहे. बारामती इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनच्या माध्यमातून अशा सर्व उद्योजकांना अनेक स्तरावर वैयक्तिक पातळीवर सहकार्य करण्यात येते.
भारत फोर्ज कंपनीचे मनुष्यबळ विभाग प्रमुख सदाशिव पाटील व कॉटनकिंगचे प्रकल्प प्रमुख खंडोजी गायकवाड यांची नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सनल मॅनेजमेंट या संस्थेच्या अनुक्रमे पुणे विभाग व बारामती शाखा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल युगेंद्र पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उद्योजक संवाद अभियान नाविन्यपूर्ण असून युवा उद्योजक युगेंद्र पवार यांच्याशी मुक्तपणे संवाद साधण्याची संधी मिळाल्याबद्दल उपस्थित उद्योजकांनी समाधान व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे संयोजक बारामती इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार, उपाध्यक्ष शरद सूर्यवंशी, सचिव अनंत अवचट, सदस्य महादेव गायकवाड, ऍड.अंबीरशाह शेख, संभाजी माने, मनोहर गावडे, ज्येष्ठ उद्योजक कृष्णा ताटे, चंद्रकांत नलावडे, सर्जेराव खलाटे, विजय झांबरे इ. युवा उद्योजकांनी केले होते.
सूत्रसंचालन अनिल सावळे पाटील यांनी केले व संभाजी माने यांनी आभार व्यक्त केले.