अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते आ.अजित पवार, पाटबंधारे विभागाचे अधिकारी अस्तरीकरणाला ज्या गावातून विरोध होईल त्या गावाचे अस्तरीकरण होणार नाही असे प्रत्येक वेळी सभेत, समक्ष बोलूनही मात्र अजुनही नागरीकांमध्ये अस्तरीकरणाबाबत संभ्रम निर्माण झालेला आहे. जोपर्यंत राज्य सरकार लेखी अध्यादेश काढीत नाही तोपर्यंत शेतकरी गहाळ बसणार नाही असेही बोलले जावू लागले आहे.
इंदापूर तालुक्यातील शेतकरी व शेतकरी संघटना अंथुर्णे पाटबंधारे विभाग या ठिकाणी उपोषणाला बसले होते. यावेळी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.पवार यांनी उपोषणकर्ते शेतकर्यांना अस्तरीकरणाबाबत मार्गदर्शन केले.
श्री.पवार म्हणाले की, आम्ही दोन दिवसात आमच्या वरिष्ठांशी चर्चा करू व शेतकर्यांची चर्चा घडवून आणू व चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्ही सर्व अधिकारी मिळून करू असे सांगितले. दि माळेगाव कारखान्याच्या मोळी पूजन कार्यक्रमात आ.अजित पवार बोलताना म्हणाले की, ज्याठिकाणी विरोध होईल त्याठिकाणी काम होणार नाही असे ठामपणे सांगितले.
शेतकरी संघटनेचे श्री.रायते म्हणाले की, हे सरकार शेतकर्याच्या मुळावर उठले आहे.पाणी नक्की कुणासाठी चालले आहे. शेतकरी उपाशी आणि अधिकारी व कॉन्ट्रॅक्टर तुपाशी अशी परिस्थिती दिसत आहे. रामकुंड, निमगाव केतकी, गोतंडी, शेळगाव, सणसर इ. ठिकाणच्या ग्रामपंचायतींनी ग्रामसभेचे ठराव व शेतकर्यांचे म्हणणे लेकी स्वरूपात पाटबंधारे खात्याला व तहसीलदार यांना दिले आहे. संविधानाने दिलेल्या अधिकाराप्रमाणे व लोकशाही मार्गाने शेतकरी आपला हक्क मागत आहे ग्रामसभेच्या ठरावाला अधिकारी व सरकार जुमानत नसेल तर लोकशाही आहे का असा प्रश्न शेतकर्यांना पडला आहे.