निरा डावा कालवा अस्तरीकरणाचा गोतंडीतील शेतकर्‍यांनी बाजार उठविला : आजी माजी आमदारांना गावबंदीचा इशारा

अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(प्रतिनिधी): येथील गोतंडी गावातून निरा डावा कालवा अस्तरीकरण कामाच्या सुरूवातीलाच खडा लागला असुन, गोतंडीतील शेतकर्‍यांनी अक्षरश: अस्तरीकरणाचा बाजार उठवून, इंदापूर तालुक्याच्या आजी माजी आमदारांना आज झालेल्या आंदोलनात शेतकर्‍यांनी मागे पुढे न पाहता थेट गावबंदीचा इशारा दिला आहे. आजी माजी आमदार शेतकर्‍यांच्या मूळावर उठल्याची चर्चा सुरू होती. येणार्‍या प्रत्येक निवडणूकीत यांना शेतकर्‍यांचा हिसका दाखविल्याशिवाय राहणार नाही असेही बोलले जात होते.

बेरेजेच्या राजकारणात आजी माजी आमदार शेतकर्‍यांच्या पाठीशी उभे राहणार की नाही याबाबत विचार करीत असतील मात्र, येणार्‍या काळात हेच शेतकरी या आजी माजी आमदारांना आस्मान दाखविल्याशिवाय राहणार नाही असेही काही शेतकरी आंदोलना प्रसंगी बोलत होते.

मौजे गोतंडी हद्दीत गावाजवळ निरा डावा कॅनॉलची स्वच्छता करून मुरूमीकरण केले त्यास शेतकर्‍यांनी हिरवा कंदील दाखवला. मात्र, या मुरूमीकरणावर कॉंक्रीटीकरणारा थर चढवला गेला त्यावेळेस गोतंडी ग्रामस्थ व शेतकर्‍यांनी व काही सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत, ठेकेदाराच्या जेसीबी यंत्राद्वारेच कॉंक्रीटचे केलेले अस्तरीकरण काढण्यास भाग पाडले व काम बंद ठेवण्याचे आदेश देत आंदोलन केले.

शेतकर्‍यांचा जीवन मरणाचा प्रश्र्न असताना एकही पुढारी त्यांच्या पाठीशी उभा राहत नाही. यापुढे कोणीही दादा,ताई, मामा,भाऊ म्हणणार नाही. येणार्‍या काळात यांना यांची जागा दाखविल्याशिवाय शेतकरी गप्प बसणार नाही असेही बोलले जात होते. इंदापूर तालुक्याचे आजी माजी आमदार शेतकर्‍यांना जाती, पातीच्या राजकारणात गुंडाळून ठेवतात. मात्र, आज शेतकर्‍यांच्या मुलभूत प्रश्र्न, जीवन मरणाचा प्रश्र्न समोर आलेला असताना सर्व शेतकरी जाती-पात, धर्म, वंश विसरून खांद्याला खांदा लावून अस्तरीकरणाचा विरोध करीत आहेत. यापुढेही शेतकरी येणार्‍या प्रत्येक निवडणूकीत जात,पात, धर्म व वंशाचा विचार न करता व पुढारी आमदार, खासदारांच्या अमिषाला बळी न पडता काम करणार असल्याचेही यावेळी बोलले जात होते.

अस्तरीकरणामुळे शेतकरी देशोधडीला लागणार आहे. शेतकर्‍यांचे कधीही भरून न येणारे नुकसान होणार आहे. शेतकरी संघटना व गोतंडी गावातील शेतकरी ग्रामस्थ मिळून दि. 7 ऑक्टोबर 2022 पासून अंथुर्णे (ता.इंदापूर) येथील इरिगेशन बंगल्यासमोर ठिय्या आंदोलन करणार आहेत. कुठल्याही परिस्थितीत कॅनॉलचे अस्तरीकरण करण्याचे काम होऊ देणार नाही, असा कडवा पवित्रा ग्रामस्थांनी व शेतकर्‍यांनी घेतला आहे.

यावेळी शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष ऍड.पांडुरंग रायते, इंदापूर तालुका अध्यक्ष सचिन कोथमीरे, जिल्हा युवाअध्यक्ष दादासोा किरकत, बारामती लोकसभा प्रभारी मंगेश घाडगे, ग्रामस्थ दिनकर नलवडे, गोतंडीचे सरपंच गुरुनाथ नलावडे, आप्पा पाटील, गुरुनाथ पाटील, प्रशांत काळे, शिवराम बनकर, बंडू काळे, नवनाथ मारकड, सुरेश मारकड, संजय कांबळे, अशोक कदम, संभाजी बरळ, दादाराम पवार, महेश पवार, रामभाऊ माने, ज्योतीराम माने, प्रहार जनशक्तीचे इंदापूर तालुका कार्याध्यक्ष विशाल कांबळे, यशवंत कांबळे, हौसेराव यादव इ. उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!