बँकेत आर्थिक शिस्त लावण्याकरीता वाईटपणा घ्यावा लागतो – आ.अजित पवार

बारामती(वार्ताहर): बँकेत आर्थिक शिस्त लावण्याकरीता वाईपणा घ्यावा लागतो असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते आ.अजित पवार यांनी केले.

बारामती सहकारी बँकेची 61वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि.25 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 9.45 वा. राजमाता जिजाऊ सभागृह बारामती येथे संपन्न झाली. यावेळी आ.पवार बोलत होते.

पुढे बोलताना आ.पवार म्हणाले की, कोरोना काळात देशाची अर्थव्यवस्था व संस्थांची अर्थव्यवस्था बिघडली आहे. रूपी, लक्ष्मी बँका बंद पडल्या तर पिंपरी सेवा व नगर बँकांची बिकट अवस्था आहे. आरबीआयने 62 बँकांचा परवाना बंद केला आहे. एनपीए, वसुली व कर्जपुरवठा कसा करावा याबाबत आरबीआयने बंधने घातलेली आहेत. नागरीकांच्या करिश्मामुळे मला एका गावच्या विकास सोसायटीच्या पंचकमिटीपासुन ते इथपर्यंत पोहचण्याची संधी मिळावी.

सुरेंद्र जेवरे यांनी मांडलेल्या स्वप्नाला उत्तर देताना आ.अजित पवार म्हणाले की, माझ्या स्वप्नात पोपटराव तुपे, उमेश पोतेकर आले. अजितराव उद्या बँकेची मिटींग आहे सर्व सभासदांना आमचा निरोप द्या सभासदांना बँकेच्या हिताच्या प्रश्र्नाची चर्चा करा, महत्वाची गोष्टीची जपवणूक करा आणि काही सभासदांना पहिल्यापासुन बरेचशे प्रश्र्न विचारायचा अधिकार आहे ते विचारतात. हजार एक लोकं आलेले असतात त्यांचा वेळ महत्वाचा असतो. एक दिवस आधी प्रश्र्न मांडणार्‍या सभासदांबरोबर संचालक मंडळाने बसावे आणि साधक बाधक प्रश्र्नांवर चर्चा करावी व त्यांच्या प्रश्र्नांना उकल करावी असे सांगितले असे म्हणताच हशा पिकला.

काही प्रश्र्नांची उत्तरे देण्याचे आरबीआयने बंधने घातलेली आहेत. तसेच कर्जदाराला संरक्षण दिले आहे. थकबाकीदारांची नावे वृत्तपत्रात दिली जातात. संविधानाने, कायद्याने, नियमाने, घटनेने, डॉ.बाबासाहेबांनी, सहकार व आरबीआयने घालून दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक आहे असेही ते म्हणाले.

कर्जाची मागणी करणारा कोणीही असला, सर्व कागदपत्रांची पुर्तता असेल तर कर्जपुरवठा त्या कर्जदारास झालाच पाहिजे. सभासदांसह मलाही वाटते की, चांगला डिव्हीडंट मिळाला पाहिजे. मात्र वसुलीही तेवढी असली पाहिजे. 31 डिसेंबर पासुन कधीही वसुल न झालेले 50 कोटी रूपये वसुल करण्यात आले आहे. 31 मार्चपर्यंत 100 कोटी पेक्षा जास्तीची वसुली करणार असल्याचा संचालक मंडळाने विश्र्वास दिला असल्याचेही आ.पवार यांनी यावेळी सांगितले.

ज्याप्रमाणे लोकं प्रॉपर्टी वारसाहक्क दाखवता त्याप्रमाणे कर्जदाराचे वारस या नात्याने कर्ज फेडावे लागेल याची जाणीव ठेवा. राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्ज माफ केले जाते. खासगी संस्था व बँकांचे कर्ज न भरल्यास जामीनदारकडून वस्तुचा लिलाव करून कर्ज वसुल केले जाते. एवढ्या मोठ्या लोकांची कर्ज माफ कशी होतात त्यामुळे सर्वांना समान न्याय पाहिजे.

बारामती बँकेला आरबीआयने ऑनलाईन एनपीए काढण्याचे आदेश दिले होते. त्याची अंमलबजावणी न केल्याने बंधने घातलेली आहेत. यापुढे आरबीचे आदेश तुमच्यासाठी नाही सर्वसामान्य नागरीकांनी ठेवलेल्या पैश्यासाठी पालन करावे असेही आ.पवार यांनी सांगितले. बँकेत येणार्‍या ग्राहकांशी उद्धट व उर्मट बोलून वागणूक देत असेल तर 36 शाखांमध्ये काय चाललेय ते पाहण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणेद्वारे चेअरमन व कार्यकारी संचालक यांना पाहण्याची व्यवस्था पुढील काळात करणे गरजेचे आहे. प्रत्येक कर्मचार्‍यांना प्रशिक्षणाची गरज आहे ते त्यांना दिले गेले पाहिजे. ई-मेलची नोंद रोजच्या रोज घेतली गेली पाहिजे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

सूचना योग्य असेल तर त्याचे स्वागतच करू, वाहतुकीची अडचण, कोंडी होणार नाही याबाबत प्रयत्न केला जाईल. बारामतीचे बारामतीपण ठेवून गालबोट न लागता, ज्या-ज्या प्रकारे सर्वांगीण विकास करता येईल त्याचा सर्वांनी मिळून प्रयत्न केला पाहिजे.

सभेचे प्रास्ताविक बँकेचे अध्यक्ष सचिन सातव यांनी बोलताना सांगितले की, अहवाल वर्षात बँकेच्या ठेवी रु. 2384.23 कोटी व कर्जवाटप रु. 1474.89 कोटी पर्यंत गेल्याचे त्यांनी सांगितले. तसेच बँकेचा शाखाविस्तार अहवाल वर्षात 36 शाखा व 1 विस्तारित कक्ष असा झाला आहे असे त्यांनी बोलताना सांगितले. बँकेस अहवाल वर्षात रिझर्व बँकेच्या नियमानुसार एन.पी.ए.व इतर आयकराच्या तरतुदी वजा जाता बँकेस रु.29.60 कोटी इतका आॉपरेटींग प्रॅोफीट झालेला असून बँकेचे 18006 सभासद असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आयकर व इतर तरतुदी पूर्ण करून बँकेला निव्वळ नफा रु.3.30 कोटी झाल्याचे अध्यक्ष यांनी सांगितले.

सध्या माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात बँक आपल्या ग्राहकांना यु.पी.आय., आर.टी. जी.एस., नेफ्ट, ई-टॅक्स, ई-स्टॅम्पिंग, पैनकार्ड काढून देणे, मोबाईल बँँकिंग, एसएमएस बँकिंग, फास्ट ट्रॅक पेमेंट सुविधा, विमा सेवा, वीज बिल भरणा सुविधा इ. सुविधा देत असल्याचे सांगितले. बँकेची वसुलीची प्रक्रीया वेगाने सुरु असून आगामी काळात दादांच्या मार्गदर्शनाखाली व सभासदांच्या सहकार्याने अधिक प्रमाणावर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करू असे ते म्हणाले.

सभेचे कामकाज बँकेचे कार्यकारी संचालक रविंद्र बनकर यांनी विषयपत्रिका वाचून व बँकेचा अहवाल वाचून सुरु केले. सभासदांनी सर्व विषय मंजूर केले.

यावेळी बँकेने प्रतिकूल परिस्थितीतही चांगली कामगिरी केल्याबद्दल अजितदादांनी समाधान व्यक्त केले. रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार कर्जवाटप करण्यात यावे तसेच वसुलीबाबतही दादांनी मार्गदर्शन केले.

रिझर्व बँकेने संचालक मंडळाव्यतिरिक्त व्यवस्थापकीय मंडळ स्थापन करण्याच्या सूचनेनुसार बँकेने तज्ञ व्यक्तींचे समावेश असलेले व्यवस्थापकीय मंडळ स्थापन केलेले आहे. या मंडळावर समिती अध्यक्ष म्हणून श्रीनिवास बहुळकर, तसेच समिती सदस्य म्हणून ऍड.शिरीष कुलकर्णी, प्रितम पहाडे (सी.ए.), शांताराम भालेराव, डॉ.अमोल गोजे,ऍड.रमेश गानबोटे व पदसिद्ध कार्यकारी संचालक म्हणून रविंद्र बनकर यांची निवड झाल्याबद्दल सभेने समाधान व्यक्त केले.

या सभेस प्रा.ज्ञानदेव बुरुंगले, ऍड.कारीम बागवान, सुर्यकांत गादिया, तैनुर शैख, शेखर कोठारी, सुरेंद्र जेवरे, रोहन देवकाते या सभासदांनी आपल्या सूचना सभेपुढे मांडल्या.

या सभेस सोमेश्र्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे, दूध संघाचे अध्यक्ष संदीप जगताप, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, जि.प.माजी अध्यक्ष विश्वासराव देवकाते, सोमेश्र्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष राजवर्धन शिंदे, माजी नगराध्यक्ष सौ.जयश्री सातव, योगेश जगताप, तसेच बँकेचे सल्लागार व रिझर्व बँकेचे निवृत्त अधिकारी अविनाश जोशी यांसह अनेक मान्यवर, व्यापारी, प्रतिष्ठीत सभासद सभेस हजर होते.

या सभेस बँकेचे उपाध्यक्ष रोहित घनवट, देवेंद्र शिर्के, ऍड. शिरीष कुलकर्णी, उध्दव गावडे, विजय गालिंदे, नामदेव तुपे, मंदार सिकची, डॉ.सौरभ मुथा, किशोर मेहता, जयंत किकले, रणजीत धुमाळ, संचालिका सौ.नुपूर शहा, डॉ.वंदना पोतेकर, सौ.कल्पना शिंदे, तज्ञ संचालक श्रीनिवास बहुळकर, प्रितम पहाडे (सी.ए.) यांसह माजी संचालक मंडळ, व्यवस्थापन मंडळ सदस्य, कार्यकारी संचालक रवींद्र बनकर, सरव्यवस्थापक विनोद रावळ व त्यांचे सहकारी सेवक वर्ग उपस्थित होते. सभेचा समारोप बँकेचे उपाध्यक्ष रोहित घनवट यांच्या आभार प्रदर्शनाने झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!