अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(प्रतिनिधी): वालचंदनगर येथील क्रांतीसुर्य सामाजिक असोसिएशनच्या वतीने महिला सक्षमीकरण प्रशिक्षण कार्यक्रम ग्रामपंचायत जांब कार्यालयात 21 सप्टेंबर 2022 रोजी आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमात सरपंच रोहिणी रुपनवर, ग्रामसेवक श्री.घोळवे व आशा वर्कर आशा रुपनवर व उपस्थित सर्व जांब गावातील महिला बचत गटाच्या तसेच गावातील अन्य महिला उपस्थित होत्या.
क्रांतीसुर्य सामाजिक असोसिएशनचे कार्यकर्ते शंकर बोडके यांनी उपस्थित महिलांचे स्वागत करून संस्थेचा परिचय करून दिला. क्रांती सामाजिक असोसिएशन या नावाने संघटना समाजात काम करीत होती परंतु काही कायदेशीर अडचणी आल्याने सर्वांच्या विचाराने संघटनेचे रूपांतर क्रांतीसुर्य सामाजिक असोसिएशनमध्ये करण्यात आले. तशी नोंदणी धर्मदाय आयुक्त पुणे यांच्याकडे करण्यात आली आहे. सदरची संस्था ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर, भूमिहीन, पीडित, वंचित विधवा, परितक्त्या महिला, पुरुष व बालके यांचे आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य विषयक जीवनमान सुधारण्यासाठी विविध व्यवसायाचे प्रशिक्षण व मार्गदर्शन करुन त्यांच्या कुटुंबाचा दर्जा उंचावणे व मुख्य प्रवाहात आणण्याचा मुख्य ध्येय व उद्दिष्ट असल्याचे श्री.बोडके यांनी यावेळी सांगितले.
संघटनेच्या मार्गदर्शिका प्रतीक्षा मिसाळ यांनी महिला सक्षमीकरण म्हणजे काय याबाबत त्यांनी सन 1772 ते आज 2022 पर्यंत च्या सामाजिक सुधारकांनी महिला सक्षमीकरण बाबत त्या-त्या काळामध्ये स्त्री सक्षमीकरण करण्यासाठी कसे प्रबोधन केले याचे सविस्तर मार्गदर्शन केले. यापुढे महिला सक्षमीकरणाची व्याख्या सांगताना कायदे व कल्याण कार्यक्रमाच्या माध्यमातून आर्थिक सामाजिक शैक्षणिक व राजकीय सर्व क्षेत्रांमध्ये महिलांना पुरुषाबरोबर हक्क व दर्जा प्रदान करून देणे, विकासासाठी संधी उपलब्ध करून देणे, स्त्री-पुरुष असमानता नष्ट करणे या प्रक्रियेला महिला सक्षमीकरण असे म्हणतात असेही त्यांनी सांगितले. राजाराम मोहनराय, विद्यासागर ईश्वरचंद्र, महात्मा ज्योतिराव फुले, महर्षी धोंडे कर्वे, पंडित रामा रानडे, रघुनाथ धोंडो कर्वे व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी महिला सक्षमीकरणाबाबतचे विचार मांडले. सतीची चाल, बहुपत्नीत्व, हिंदू धर्मातील अनेक बुरसटलेल्या रूढी, परंपरा, प्रथा प्रतिगामी समाजाकडून मिळणारी क्रुर हिंसक वागणूक या सर्व प्रथेला झुगारून द्यावे. विधवाविवाह, बालविवाह बंदी, कन्या विक्री बंदी, स्त्री वारसा या बाबत स्त्रियांचा शिक्षणावर भर देऊन त्यांनी स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी शिक्षणासारखे दुसरे प्रभावी साधन नाही. शेवटी थोडक्यात शिक्षण व स्वावलंबन समता म्हणजे सक्षम समाज हे कर्वे यांचे स्त्री सक्षमीकरणाचे प्रमुख सूत्र सांगितले. महिला सक्षमीकरणाचे मुख्य उद्देश आणि राबवले जाणारे उपक्रम व योजना मांडल्या.
शेवटी क्रांतीसुर्य सामाजिक असोसिएशनचे सचिव अनिल दनाने यांनी आभार मानले.