अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(प्रतिनिधी): दरवर्षी काहींचे मस्टरचे बिल नियमित काढायचे, कारखाना व्यवस्थित दर देतो असे भासवून ऊस उत्पादकांना ऊस घालण्यास प्रवृत्त कराचे आणि सहा-सहा महिने बिलं रखडावयाची असा सावळा गोंधळ कर्मयोगी सहकारी साखर कारखाना बिजवडीत सुरू आहे. तसेच ऊसाची संपूर्ण एफआरपी रक्कम ऊस उत्पादकांच्या खात्यावर जमा करावी अन्यथा राष्ट्रीय समाज पक्षातर्फे 1 ऑक्टोबर 2022 रोजी आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही कारखान्याचे कार्यकारी संचालक यांना देण्यात आला आहे.
यावेळी बोलताना रासपचे जिल्हाध्यक्ष किरण गोफणे म्हणाले की, कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना गेल्या अनेक वर्षांपासून ऊस बिलाच्या बाबतीत शेतकर्यांची फसवणूक करत आलेला आहे. गेले तीन वर्षे एकदाही वेळेत एफआरपीची रक्कम या कारखाने दिलेली नाही.
इंदापूर तालुक्यातील छत्रपती कारखाना, भवानीनगर व बारामती ऍग्रो या साखर कारखान्यांच्या तोडीचा दर कर्मयोगी कारखान्याने दिला नाही. उलट 400 ते 500 रुपयांचा नेहमीच फरक देत आलेला आहे. आजपर्यंत ऊस उत्पादक शेतकर्यांचे करोडो रुपयांचे नुकसान कर्मयोगी कारखान्याने केलेले आहे. बिल सोमवारी जमा होईल, बँकेत पैसे येऊन पडलेत, गुरुवारी जमा होईल, पंधरा दिवसात जमा होईल ही कारणे ऐकुन ऊस उत्पादक शेतकरी मेटाकुटीस आलेली आहेत. या कारणांमुळे तालुक्यातील शेतकरी खासगी सावकाराला बळी पडलेला दिसत आहे. शेतकर्यांची बाजारामध्ये पत राहिलेली नाही त्यामुळे कोणी दारात उभे सुद्धा करत नाही ही द्विधा परिस्थिती निर्माण झालेली आहे.
मध्यंतरी एका करमाळ्यातील शेतकर्याचा रडत असतानाचा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला आहे. त्यामध्ये तो शेतकरी पाच हजार रुपयासाठी माझा बाप मेला मला फक्त पाच हजार रुपये द्या असे कारखान्याकडे तो विनवणी करत होता. अशीच परिस्थिती अनेक शेतकर्यांची झालेली आहे. कर्मयोगी कारखान्याचा सावळा गोंधळाबाबत वाचा फोडण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्ष एक ऑक्टोबर पर्यंत दररोज प्रत्येक गावामध्ये जाऊन या कारखान्याच्या धोरणाच्या विरोधात आंदोलनात सामील होण्यासाठी जनतेला साद घालणार आहे. शेतकर्यांना त्यांच्या फरकासह व्याजाचे रक्कम मिळवून देण्यासाठी जीवाचं रान करणार आहे. एवढं करूनही कर्मयोगी कारखाना प्रशासनाने शेतकर्यांची मागणी मान्य केली नाही तर एक ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजता इंदापूर बायपास येथील मालोजीराजे चौक या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे.
यावेळी पुणे जिल्हा उपाध्यक्ष सतीश शिंगाडे, तानाजी शिंगाडे, युवक आघाडीचे आकाश पवार, इंदापूर शहराध्यक्ष श्रीनिवास सातपुते इ. प्रमुख पदाधिकार्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.