अशोक घोडके यांजकडून…
इंदापुर(प्रतिनिधी): कांद्याचे विक्रमी उत्पादन झालेले असताना केंद्र सरकारने कांद्याची निर्याद बंदी हटविण्याची शेतकर्यांनी आंदोलन करून मागणी केली आहे. यावेळी मोफत कांद्याचे वाटप करून केंद्र सरकारचा निषेध केला आहे.
निमगाव केतकी येथील सुवर्णयुग गणेश मंदिर येथे संविधानिक मार्गाने सरकारने कांदा निर्यात सुरू करावी, शेतकर्यांनी विकलेल्या कांद्याला एक हजार रुपये प्रतिक्विंटल अनुदान द्यावे यासाठी आंदोलन करण्यात आले.
कांद्याचे विक्रमी उत्पादन झाल्याने शेतकर्यांचा 40% पेक्षा जास्त कांदा चाळीत साठवण करावा लागत आहे. साठवण केलेला कांदा सडत चालल्याने शेतकर्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. कांदा ज्यावेळी चाळीतून विक्रीसाठी काढला तर कांद्याचे दर पडलेले आहेत. यामुळे शेतकरी द्विधा परिस्थितीत सापडलेला आहे.
गेल्या हंगामात कांद्याला 25-30 रुपये किलो दर मिळाला होता. यावेळी मात्र 9 ते 14 पर्यंत दर मिळत आहे. कांदा उत्पादनाचा एकंदरीत प्रति क्विंटल खर्च 1800 ते 2000 च्या दरम्यान आहे. अशा वेळेस प्रति क्विंटल हजार रुपयापर्यंत थेट तोटा उत्पादकांना बसत आहे.
यावेळी शेतकरी सुकाणू समितीचे अध्यक्ष ऍड.श्रीकांत करे यांनी जमलेल्या शेतकर्यांना मार्गदर्शन केले. तसेच सरकारच्या धोरणाचा निषेध करत शेतकर्यांकडून मोफत कांदा वाटण्यात आला.
यावेळी ऍड. सचिन राऊत, बापू चांदणे, ऍड.मुलाणी, ऍड.रोहित लोणकर ऍड.संदीप शेंडे, राजकुमार भोंग, प्रवीण डोंगरे, दादासो किरकत, मंगेश घाडगे, धनंजय राऊत, दत्तात्रय मिसाळ, विलास मिसाळ तसेच शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.