अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर (प्रतिनिधी): शिक्षकांनी मुख्यालय राहण्याचा निर्णय रद्द करण्यासाठी मी शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री व इंदापूरचे तत्पर आमदार दत्तात्रय भरणे यांनी केले.
इंदापूर प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचा 99 वार्षिक सर्वसाधारण सभा कर्मयोगी शंकरराव पाटील सभागृहात संपन्न झाली. याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून श्री.भरणे बोलत होते. यावेळी आदिनाथ धायगुडे उपस्थित होते.
पुढे बोलताना आ.भरणे म्हणाले की, मुख्यालयात शिक्षकांनी राहावे हा शासन निर्णय जुना आहे. ज्या काळात दळणवळणाची साधने उपलब्ध नव्हती त्या काळात शिक्षकांनी मुख्यालयात राहिल्यास गुणवत्ता सुधारेल असे शासनाचे धोरण होते. परंतु बदलत्या काळानुसार या निर्णयात शिथिलता येत गेली, दळणवळणाची साधने उपलब्ध झाली असल्याने हा मुद्दा कालबाह्य झाला आहे. काही राजकीय व इतर क्षेत्रातील मंडळी शिक्षकांना वेठीस धरण्यासाठी या धोरणाची भिती दाखवित असल्याचे त्यांनी सांगितले. लवकर हा निर्णय रद्द करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ज्या शिक्षकांना पेन्शन नाही, मात्र हे शिक्षक सेवेत असताना मयत झाले असता त्यांच्या कुटुंबियांना 31 लाखाची मदत करणारी राज्यातील प्रथम शिक्षक संस्था इंदापूरची याचा अभिमान वाटतो असेही ते म्हणाले.
आदिनाथ धायगुडे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, पेन्शन धारक शिक्षक मृत पावल्यास कुटुंबास 20 लाख रुपये तर डीसीपीएस धारक शिक्षक मृत पावल्यास कुटुंबास 31 लाख रुपये देणारी इंदापूर प्राथमिक शिक्षक पतसंस्था ही महाराष्ट्रातील एकमेव पतसंस्था ठरली आहे.
सभेत अनेक महत्त्वाचे निर्णय एकमताने घेण्यात आले. यामध्ये सभासदाची कर्ज मर्यादा 20 लाखांवरून 30 लाख रुपये करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. सभासदांनी टाळ्या वाजवून या निर्णयाचे स्वागत केले. तातडीचे कर्ज योजनेत 50 हजार रुपये मर्यादिवरून 75 हजार रुपये पर्यंत मर्यादा वाढवण्यात आली. या सर्वसाधारण सभेमध्ये गेल्या आर्थिक वर्षात झालेल्या कामकाजाचा लाभांश सहा टक्के देण्याचा निर्णय संचालक, मंडळाने घेतला. त्याचप्रमाणे मागील संचालक मंडळाने केलेली आर्थिक उधळपट्टी व बोगस बिलांची चौकशी लावणार असल्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.
याप्रसंगी प्रत्येक सभासदांना भत्ता रुपये 709 देण्यात आला. काही विरोधकांनी विरोध जरी केला असला तरी सर्व विषयी मार्गी लागले असल्याचे संचालक मंडळाकडून सांगण्यात आले. व्यापारी संकुलास कोणत्याही राजकीय व्यक्तीचे नाव देण्यापेक्षा महामानवांचे नाव देऊन जागतिक संदेश दिला आहे असे संचालक मंडळाचे मत आहे.
आ. दत्तात्रय भरणे यांची शिक्षकांनी घोड्यावर बसून मिरवणूक काढली. आ.भरणेमामांना गेली 7 वर्ष वार्षिक सर्वसाधारण सभेस बोलविण्याची मागणी सभासदांकडून करण्यात आली.
यावेळी जिल्हा आदर्श शिक्षक शिष्यवृत्ती गुणवत्ता धारक नवोदय पात्र, सैनिक स्कूल पात्र दहावी 90%/ बारावी 85% च्या पुढील नीट आणि जेईईमध्ये चमकलेले प्राथमिक शिक्षकांची मुले, संस्थांचे राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षक सेवानिवृत्त शिक्षक यांचा सत्कार करून गुणगौरव करण्यात आला.
या कार्यक्रमात माजी राज्यमंत्री व इंदापूरचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते शिवाजी लाळगे लिखित आठवणींच्या हिंदोळ्यावर या पुस्तकाचे प्रकाशन झाले. शिवाजी लाळगे हे इंदापूर तालुक्यातील बोरी गावचे असून सध्या ते काझड प्राथमिक शाळेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. शिवाजी नाळगे यांनी लिहीलेले आठवणींच्या हिंदोळ्यावर हे पुस्तक जुन्या काळातील प्रसंगावर आधारीत पुस्तक आहे. जुन्या काळातील पडद्यावरील पिक्चर, लग्न सोहळा, जागरण, शाळा अशा विविध विषयांवर लेखन या पुस्तकात केले आहे. पुस्तक वाचताना प्रत्येक व्यक्तीचे बालपण डोळ्यासमोर आल्याशिवाय रहाणार नाही असे मत लेखक शिवाजी लाळगे यांनी यावेळी व्यक्त केले.