बारामती नगरपरिषदेला झोपडपट्टी सुरक्षा दलाचे विविध मागण्यांचे निवेदन

बारामती(वार्ताहर): कंत्राटी कामगारांना किमान वेतनानुसार वेतन मिळत नसून ते मिळण्यासाठी प्रयत्न करावे यासह अनेक मागण्यांचे निवेदन झोपडपट्टी सुरक्षा दलाचे राज्य संघटक तानाजी पाथरकर यांनी बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांना दिले.
  या निवेदनामध्ये महिला बालकल्याण विभागाच्या योजना या दुर्बल मागासवर्गीय विधवा महिला या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी नगरपालिके कडून प्रयत्न करण्यात यावेत. या योजना शेवटच्या स्तरापर्यंत न पोहोचविणार्‍या अधिकार्‍यांवर कार्यवाही करावी. मागासवर्गीय समाजातील महिला बचत गटांना प्राधान्य देऊन त्यांना मदत करण्यात यावी.
  बारामती शहरातील प्रभाग 17 व 18 मधील महिलांसाठी बस स्थानकासमोर तीन ते चार शौचालय बांधून देण्यात यावे. अतिक्रमण विभाग व भंडार विभाग प्रमुखांना वेळोवेळी दिलेल्या तक्रारींवर मुदतीत कारवाई न केल्याने यांच्यावर तात्काळ शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात यावी.
  बारामती शहरातील वाढत्या डेंगू, चिकनगुनियाचा प्रभाव रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तात्काळ राबविण्यात यावेत. सिल्व्हर ज्युबिली हॉस्पिटलच्या माध्यमातून गोरगरीब नागरिकांना कमीत कमी किंमतीत औषध उपचार मिळावा यासाठी उपाययोजना राबवण्यात यावे.
  उद्यानाची दुरावस्था तात्काळ दुरुस्त करण्यात यावी. इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्यात यावी. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात यावा. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचा सर्व्हे करून त्यांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा इ. स्वरूपाचे निवदेन देण्यात आले. तातडीने कारवाई न केल्यास आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
  यावेळी राज्य संघटक तानाजी पाथरकर, जिल्हाउपाध्यक्ष आबासाहेब शिंदे, शंकर चव्हाण, सुरेश अडागळे, संजय वाघमारे यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!