बारामती(वार्ताहर): लंपी चर्मरोग हा प्राण्यांमध्ये जलदगतीने पसरणारा अनुसूचित रोग असल्याचे बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीचे जळोची उपबाजार येथील दर गुरूवारी भरणारा जनावरे बाजार पुढील आदेश होईपर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याचे बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.
दि.02 जून 2022 रोजीचा शासन निर्णय व दि.9 सप्टेंबर 2022 रोजी जिल्हाधिकारी यांनी जाहिर केलेल्या परिपत्रकानुसार प्राण्यामधील संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम च्या अनुषंगाने लंम्पी स्किन डिसीज बाधित क्षेत्र व निगराणी क्षेत्र घोषित केलेले आहे. त्यामुळे गोजातीय प्रजातीची सर्व गुरे व म्हशी यांची एका ठिकाणावरून दुसर्या ठिकाणी व नियंत्रित क्षेत्राच्या बाहेर नेण्यासाठी कोणत्याही व्यक्तीस तसेच गोजातीय प्रजातीच्या गुरे व म्हशीचा कोणताही प्राणी बाजार भरवणे, प्राण्याच्या शर्यती लावणे, प्राण्यांची जत्रा भरविणे, प्राण्यांचे प्रदर्शन आयोजित करणे आणि नियंत्रित क्षेत्रात गोजातीय प्रजातीच्या प्राण्यांचे गट करून किंवा त्यांना एकत्रित करून कोणताही कार्यक्रम पार पाडणे यास मनाई करण्यात आलेली आहे. सदर रोगाचा प्रसार होण्यास प्रतिबंधात्मक उपाययोजना करणेच्या सुचना दिल्या आहेत.
सर्व पशुपालक व शेतकर्यांनी आपल्या जनावरांची काळजी घ्यावी. आपले गुरे व म्हशी, शेळीमेंढी विक्रीस आणु नये असे आव्हान बाजार समितीचे प्रसाशक मिलिंद टांकसाळे व सचिव अरविंद जगताप यांनी केले आहे.