उत्साही अधिकार्‍यांमुळे बारामतीत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव होत आहे जल्लोषात साजरा : बारामती शहर पोलिसांतर्फे 10 व 5 कि.मी. मॅरेथॉन संपन्न

बारामती(वार्ताहर): संपूर्ण देशात भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. हा उत्साह द्विगुणीत करण्यासाठी उत्साही अधिकार्‍यांची कृती महत्वाची असते. तोच उत्साह बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे व बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनिल महाडीक या जोश व उत्साह वाढविणार्‍या अधिकार्‍यांमुळे अमृत महोत्सव जल्लोषात साजरा होत आहे. त्यानिमित्त 10 व 5 कि.मी. मॅरेथॉनचे आयोजन बारामती शहर पोलीसांतर्फे करण्यात आले होते या मॅरेथॉनला बारामतीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

14 ऑगस्ट रोजी लोकांमध्ये आरोग्याविषयी स्वतः प्रति जागृती निर्माण व्हावी म्हणून नागरी वस्ती मधून दहा व पाच किलोमीटर मॅरेथॉन आयोजित करण्यात आले होते. या स्पर्धेला बारामती सत्र न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश श्रीमती जे.पी.दरेकर, प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी ए.जे.गिर्‍हे व न्यायाधीश श्री.अतकिरे यांनी हिरवा झेंडा दाखवून सकाळी सव्वा सहा वाजता सुरुवात केली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, विरोधी पक्षनेते आ.अजित पवार यांचे खाजगी सचिव हनुमंत पाटील उपस्थित होते.

सदर मॅरेथॉनची भिगवण रोडने सुरूवात होऊन जैन मंदिर, माळावरची देवी, प्रशासकीय भवन, कसबा, देशमुख चौक गांधी चौक, सिनेमा रोड करीत तीन हत्ती चौकामध्ये समारोप करण्यात आला.

या मॅरेथॉनमध्ये पाच वर्षाच्या मुलापासून ते 75 वर्षाच्या महिला व पुरूषांनी सहभाग नोंदवला. विविध क्षेत्रात कार्यरत असणार्‍या उभयतांनी सहकुटुंब सहभाग नोंदवला. बारामती शहर पोलीस ठाण्याकडे नेमणुकीस असलेले अधिकारी, कर्मचारी तसेच दंगल काबू पथक यातील कर्मचारी व विविध पोलीस ऍकॅडमीतील विद्यार्थ्यांनी सुद्धा मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

मी साध्या वेशातील पोलीस व पोलीस वर्दीतील माणूस या घोषवाक्य खाली तयार करण्यात आलेल्या सेल्फी पॉईंटवर अनेकांनी सेल्फी आपल्या मोबाईलमध्ये कैद केल्या.

या मॅरेथॉनच्या माध्यमातून स्वतःसाठी आरोग्य जपा हा मंत्र बारामतीकरांपर्यंत पोहोचला. एन्व्हॉर्लमेंटल फोरम ऑफ इंडियाने यामध्ये भाग घेतला. आजच्या दिवशी अनेक ठिकाणी सायकल रॅली व मॅरेथॉन, ट्रेकिंग असताना सुद्धा अडीचशे लोकांनी सहभाग नोंदवला. विशेष बाब म्हणजे अनेक पत्रकार बंधू हे सुद्धा मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेले होते व त्यांनी पोलिसांना सहकार्य केले.

सदरच्या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या आदेशान्वये बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक व त्यांचे सर्व अधिकारी कर्मचारी यांनी बंदोबस्त व कामाची व्यस्तता असताना सुद्धा थोड्या कालावधीत केले.

बारामती शहर पोलिसातर्फे सायबर क्राईम अवेअरनेस, पोलिसांची ओळख, वाहतुकीचे नियम पाळा अपघात टाळा, या संकल्पनेतून दोन दिवसात विविध कार्यक्रम राबवण्यात आले आहेत. सर्व सहभागी मान्यवरांना प्रमाणपत्र देण्यात आले. समारोपानंतर देशभक्तीपर गितावर मॅरेथॉन पूर्ण केलेल्या सहभागी युवक, पोलीस, पत्रकारांनी ठेका धरला व आनंद लुटला.

या सर्व कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अनिल साळवे पाटील व सलिम सय्यद यांनी केले. या दोघांचे याठिकाणी कौतुक करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!