अशोक घोडके यांजकडून….
इंदापूर(प्रतिनिधी): प्रथम राष्ट्र नंतर आपण, ही सर्वश्रेष्ठ भूमिका गावपातळीपासून ते देशातील प्रत्येक नागरिक घेताना दिसत आहे, हे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे यश असल्याचे गौरोद्गार माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी काढले.
इंदापूर शहरातून शनिवारी (दि.13) सायंकाळी 4 वा. अमृत महोत्सवी स्वातंत्र्यानिमित्ताने हर्षवर्धन पाटील यांचे नेतृत्वाखाली ऐतिहासिक अशी भव्य तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली याप्रसंगी श्री.पाटील बोलत होते.

या रॅलीमध्ये भाजपचे पुणे जिल्हा सरचिटणीस धर्मेंद्र खांडेर, निरा भीमा कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील, भाजप जिल्हा ओबीसीचे अध्यक्ष मयूर कांबळे, भाजपचे तालुकाध्यक्ष ऍड.शरद जामदार, शहराध्यक्ष शकील सय्यद इ. मान्यवर उपस्थित होते.
पुढे श्री.पाटील म्हणाले की, देशाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने देशप्रेमाची जाणीव ही प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये बळकट व्हावी, या उदात्त हेतूने लोकसहभागातून हर घर तिरंगा ही मोहीम राबवली जात आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून हर घर तिरंगा मोहीम सुरू आहे. स्वातंत्रवीरांनी दिलेल्या बलिदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी, नव्या पिढीला स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासाचे स्मरण या निमित्ताने होत आहे. इंदापूर तालुक्यातील अनेक स्वातंत्रसैनिकांनी स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला. या सर्वांना मी विनम्र अभिवादन करतो.
या रॅलीमध्ये युवकांचा प्रचंड असा उत्साही सहभाग दिसून आला. रॅलीमुळे संपूर्ण इंदापूर शहरात वंदे मातरम व विविध घोषणामुळे देशप्रेमाची लहर निर्माण झाल्याचे चित्र होते.
तिरंगा ध्वज हा देशप्रेमाचे व धर्म-पंथांच्या एकजुटीचे प्रतीक आहे. रॅली मध्ये आबाल-वृद्ध असे सर्व वयोगटातील नागरिक सहभागी झाले होते, त्याबद्दल हर्षवर्धन पाटील यांनी सर्वांना धन्यवाद दिले.
इंदापूर येथील मालोजीराजे चौक (बायपास) येथून बाईक रॅलीचा प्रारंभ झाला. संपूर्ण इंदापूर शहरातून बाईक रॅली मार्गस्थ होऊन जुन्या बाजार समितीच्या प्रांगणात सांगता झाली. तत्पूर्वी रॅलीचे मार्गावरील महापुरुषांच्या पुतळ्यांना व नगरपालिकेच्या समोरील स्वातंत्र्यसैनिकांच्या स्तंभांस हर्षवर्धन पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
या रॅलीमध्ये बहुसंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक, हजारोंच्या संख्येने सहभागी झाले.