बारामती (प्रतिनिधी): राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या बालेकिल्ल्यात खंडोबानगर भोईगल्ली येथे रक्षाबंधनाच्या पूर्वसंधेला पुरूषांकडून महिलांना मारहाण प्रकरणी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश ओबीसी विभागाचे उपाध्यक्ष रोहित बनकर यांनी अन्यायाविरोधात आवाज उठविला व आठ दिवसात आरोपींना अटक झाली पाहिजे अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा पोलीस प्रशासनाला दिला आहे.
दि.10 ऑगस्ट 2022 रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान भुई गल्ली, खंडोबानगर या ठिकाणी डुकरामुळे असणारा स्थानिक लोकांना त्रासाबाबत दोघांमध्ये बैठक सुरू असताना यातील आरोपींनी महिलांना बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. सदर महिलांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिल्याने आरोपींनी बेदम मारहाण केल्याने या आरोपींवर बेकायदा जमा जमवणे, मारहाण करणे, महिलांचा विनयभंग करणे, जबरदस्तीने मोबाईल चोरून नेणे, अल्पवयीन मुलीला लज्जास्पद मारहाण करणे याबाबी लक्षात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
या गुन्ह्यातील आरोपी आजही मोकाट आहेत. या महिलांना न्याय मिळाला नाही तर कॉंग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर आरोपी अटक न केल्यास सदरचा विषय विधिमंडळात नाना पटोले यांच्याकडे सादर करणार असल्याचे रोहित बनकर यांनी सांगितले.
रक्षाबंधनाच्या पूर्व संधेला आज अशी घटना कोणाच्या बहिणींनीबाबत होत असेल तर ही खूप लज्जास्पद बाब असल्याचेही बनकर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
बारामतीच्या लोकसभेच्या खासदार महिला, नगराध्यक्षा महिला इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा महिला राज, राज्याच्या विरोधी पक्ष नेते व माजी उपमुख्यमंत्र्यांचे गाव असताना विशेष म्हणजे महिला धोरण करणारे, राबविणारे व त्यांची अंमलबजावणी करणारे खा.शरदचंद्रजी पवार यांच्या बारामतीत महिलांना पुरूषांकडून मारहाण होत असेल तर महिला धोरण कागदावरच आहे का? असाही प्रश्र्न रोहित बनकर यांनी उपस्थित केला आहे. या घटनेचा तीव्र निषेध सुद्धा त्यांनी यावेळी केला.
महाराष्ट्राला पुरोगामी, सामाजिक व राजकीय सुधारणांची प्रदीर्घ परंपरा आहे, राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, गोपाळ गणेश आगरकर, महर्षी कर्वे, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, विठ्ठल उमाजी शिंदे अशा असंख्य विभूतींनी महाराष्ट्राची जडण घडण केली आहे. महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रेरणेने राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीतून ती अधिकाधिक समृद्ध होत गेली आहे. स्व:कर्तृत्वावर सत्ता मिळाल्यानंतर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर दिवंगत इंदिरा गांधी यांनी महिलांचे प्रभुत्व सिद्ध केलेले आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री माननीय यशवंतरावजी चव्हाण यांनी या परंपरेचे जनत केले आहे अशा भूमित महिलांवर अत्याचार होत असतील तर ही खूप मोठी शोकांतिका असल्याचेही रोहित बनकर यांनी सांगितले.
बारामतीत विविध संघटना आहेत, पक्ष आहेत. मात्र, या महिलांच्या पाठीशी कॉंग्रेसेच कट्टर समर्थक व महाराष्ट्र प्रदेश ओबीसी विभागाचे उपाध्यक्ष रोहित बनकर यांनी आवाज उठविला आहे. आज या अन्यायग्रस्त महिलांसाठी रक्षाबंधनानिमित्त पाठीराखा भावाप्रमाणे रोहित बनकर यांनी भूमिका बजावल्याने सर्व स्तरात त्यांच्याबाबत अभिमान व्यक्त केला जात आहे.