अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(प्रतिनिधी): स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी अगोदर राजकारण तापण्यास सुरूवात झाली असताना, त्यादृष्टीने हालचालींना वेग आलेला दिसत आहे. त्या पार्श्र्वभूमीवर इंदापूरमध्ये कॉंग्रेस, शिवसेना, बहुजन मुक्ती पार्टी, रासप व शेतकरी संघटना यांची संयुक्त बैठक संपन्न झाली आहे.
इंदापूर तालुक्यात काही दिवसानंतर पंचायत समिती, जिल्हा परिषद व इंदापूर नगरपालिकेची निवडणूक होणार आहे. याच अनुषंगाने सर्वपक्षीय एकजूट करून भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेस या प्रस्थापित पक्षांना शह देण्यासाठी व त्यांच्या विरोधात सक्षम असे उमेदवार देण्यासाठी सदरची बैठक झाल्याचे समजत आहे.
सर्वांनी मिळून वेगवेगळे उमेदवार न देता एकच उमेदवार दिल्यास मत विभाजन टळून उमेदवार निवडून येण्याचे सर्वाधिक चान्सेस असल्याने एक वेगळाच प्रयोग इंदापूरमध्ये होणार आहे.
पुढील बैठक दि.6 ऑगस्ट रोजी होणार असून सदरच्या बैठकीमध्ये अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची खात्रीलायक वृत्त आहे.
सदरच्या बैठकीस इंदापूर तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष स्वप्निल सावंत, बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव ऍड.राहुल मखरे, शिवसेना तालुकाप्रमुख नितिन शिंदे, राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष किरण गोफणे, शेतकरी संघटनेचे गुलाब फलफले यांच्यासह शिवसेना, कॉंग्रेस, बहुजन मुक्ती पार्टी व शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.