अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर (प्रतिनिधी): आयुष्यात कितीही संपत्ती, पद, प्रतिष्ठा कमावली याला महत्त्व नसून आपण आपल्या संस्कारावरती कशा पद्धतीने पुढे चालत आहोत हे महत्वाचे असल्याचे मत माजी राज्यमंत्री आ.दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले.
इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथे (दि.28 जुलै) संत सावतामाळी मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने माजी राज्यमंत्री भरणे यांनी संत सावता महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर ते गावातील भाविक भक्तांची संवाद साधत असताना बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, संत शिरोमणी सावता महाराज यांचे विचार आत्मसात करणे ही काळाची गरज असून आपल्या आई-वडिलांची सेवा हीच ईश्वर सेवा असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. निमगावातील संत सावतामाळी मंदिरासाठी सभा मंडप असेल, भक्ती निवास असेल किंवा इतर विकास कामांसाठी निधीची कमतरता भासू दिली नाही. यापुढेही निमगावातील या मंदिरासाठी भरघोस निधी देणार असल्याचे सांगितले. आपल्या आई-वडिलांची सेवा करावी असे सांगत त्यांनी अनेक गोष्टींचा या ठिकाणी उहापोह केला. आमदार पोटतिडकिने व हिरहिरीने बोलत असताना उपस्थितांना गहिवरून आले. यावेळी त्यांनी संत सावता महाराजांच्या मंदिरात पूजा केली दर्शन घेतले आणि चांगला पाऊस पडू दे! बळीराजा कष्टकरी यांना धन समृद्धी लाभू दे! अशा पद्धतीचे साकडे घातले.
यावेळी संत सावतामाळी प्रतिष्ठानचे सर्व संचालक, सभासद, भजनी मंडळ, उत्सव कमिटीसदस्य, गावचे सरपंच प्रवीण डोंगरे, ऍड.सचिन राऊत, पांडुरंग हेगडे, तात्यासाहेब वडापुरे गोरख आदलिंग संदिप भोंग, यांच्यासह आदी मान्यवर भाविक भक्त गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.