बारामती(वार्ताहर): येथे वाहन, जमीन खरेदी-विक्री, करारनामा इ.लागणारे स्टॅम्प (मुद्रांक) खरेदी करणारे आंधळे आहेत. भारत सरकारने स्टॅम्पपेपरवर स्पष्ट हिंदी व इंग्रजी अक्षरात रू.100 असे लिहिलेले असताना सुद्धा संबंधित मुद्रांक विक्रेत्यांना 110 ते 130 रूपये देतात यावरून खरेदीदार आंधळे असल्याचे स्पष्ट होते.
खरेदीदारांना सदर स्टॅम्पपेपर घेतल्यानंतर त्याची पावती मिळते हे माहिती आहे का नाही हेच कळत नाही. हेच आंधळे खरेदीदार मुद्रांक विक्रेत्याच्या नावाने हाताला चुना लावून संपूर्ण गावात बोंबलत असतात, स्टॅम्प विक्रेते 100च्या स्टॅम्पला 30 रूपये जास्त आकारतात. जास्त पैसे नाही दिले तर स्टॅम्प शिल्लक नाही म्हणून सांगतात. अशावेळी संबंधित मुद्रांक विक्रेत्याचे रजिस्टर तपासणीचा अधिकार स्टॅम्प खरेदी करणार्याला आहे. स्टॅम्प शिल्लक असताना त्याने स्टॅम्प न दिल्यास त्या स्टॅम्प विक्रेत्याची तक्रार दुय्यम निबंधक किंवा निबंधक यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार करता येते. मात्र, स्टॅम्प खरेदीदाराला एवढी घाई असते की, तो रू.100 च्या स्टॅम्पसाठी 50 रूपये जास्तीचे देण्यासाठी एका पायावर तयार असतो त्यामुळे इतर खरेदीदार सुद्धा त्याचे अनुकरण करतात. त्यामुळे स्टॅम्प खरेदीदार आंधळा तर आहेच व स्वत:ची फसवणूक, अडवणूक व पिळवणूक स्वत:च करून घेत असल्याचेही दिसत आहे.