वन हद्दीत झाडे तोडून कोळसा भट्‌ट्या : बारामती वन अधिकार्‍यांची बघ्याची भूमिका

बारामती(प्रतिनिधी): तालुक्यातील लोणीभापकर गावात वन हद्दीतील झाडे तोडून कोळसा भट्‌ट्या लावण्यात आल्या असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते अनिल शिवाजी गुणवरे यांनी वेळोवेळी बारामती वन परिक्षेत्र अधिकार्‍यांना कळवूनही हे खाते बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप केला आहे.

अनिल गुणवरे यांनी दिलेल्या तक्रारी अर्जात म्हटले आहे की, दि. 30 मे 2022 रोजी बरामती-जेजुरी मार्गी जाताना लोणीपाटी हद्दीत वन विभागातील झाडे तोडून ट्रॅक्टर भरीत असताना त्यांच्या निदर्शनास आले. गुणवरे यांनी चाललेल्या प्रकाराबाबत फोटो काढले आणि दि.3 जून 2022 रोजी बारामती वन परिक्षेत्र अधिकारी यांना लेखी अर्जासोबत जोडून दिले व संबंधितावर कारवाई होणेबाबत मागणी केली.

अनिल गुणवरे यांनी या प्रकरणाबाबत पाठपुरावा करीत पुन्हा त्याच जागी गेले असता त्याठिकाणी लाकडांचा कोळसा तयार झालेला दिसला. सदरचा कोळसा वाहुन नेण्यासाठी त्याठिकाणी टेम्पो सुद्धा आला होता. या टेम्पोसह फोटो काढून वनपरिक्षेत्र अधिकारी व उपवन संरक्षक अधिकारी यांना पाठवून दिले. तरी सुद्धा कोणतीही कारवाई झाली नाही. जैसे थे प्रकार पाहुन गुणवरेंच्या मनात आणखीन शंका निर्माण झाल्या.

गुणवरे यांनी कोळसा बनविणार्‍या कामगारांना विचारणा केली असता, त्या कामगारांनी पाचपुते नावाचे साहेब येतात व एक पुण्यावरून महिला येते व ते याठिकाणी भेट देवून जातात असे सांगितले असल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. मोरगांवचे वनपाल श्री.पाचपुते असल्याचे कळालेनंतर गुणवरे यांनी त्यांना संपर्क साधला त्यांना सर्व हकीकत सांगितली मात्र अपेक्षित उत्तर मिळाले नाही व थेट उडवाउडवीची उत्तरे मिळाली असल्याचेही गुणवरे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
ज्याठिकाणी अर्ज दाखल केला म्हणजे बारामती वन परिक्षेत्र यांच्याकडे दिलेल्या तक्रारी अर्जाबाबत कोणती कारवाई केली याबाबत माहिती घेण्यात गेलो असता ते त्याठिकाणी उपस्थित नव्हते.

महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत (विनियमन) अधिनियम, 1964 नुसार कलम 3 चे उल्लंघन करून सदरील झाडे तोडण्यात आली. कलम (3) चे पोट कलम (2) अन्वये संबंधित मालमत्ता ताबडतोब ताब्यात घेणे गरजेचे असताना संबंधित बारामती वन परिक्षेत्र अधिकारी व वनपाल यांनी संबंधितावर कारवाई करण्यास कुचराई केली आहे. संबंधित अर्जदार गुणवरे यांनी बारामती वन परिक्षेत्र अधिकारी यांना दि.3 जून 2022 रोजी कळविले, त्यानंतर पुन्हा दि.17 जून 2022 रोजी पत्र दिले कारवाई होत नाही म्हणून पुन्हा पहिले स्मरणपत्र दि.24 जून 2022 रोजी दिले तरी सुद्धा कारवाई सुरू आहे असे सांगितले जात असल्याचे गुणवरे यांनी सांगितले आहे.

तक्रारदार यांच्या तक्रारीवरून संबंधित वन परिक्षेत्र अधिकारी यांनी सदरचा टेम्पो त्याठिकाणी असणारे कामगार व मालमत्ता ताब्यात घेणे गरजेचे होते. तक्रारदार आज दि.25 जून 2022 रोजी सदर ठिकाणची पाहणी केली असता कोळश्याचे ठिक्के भरून ठेवलेले आहेत ते रात्रीत लंपास होतील असे सद्यपरिस्थिती त्यांनी सांगितली आहे.

सदर प्रकरणाबाबत माहिती घेण्यासाठी आमच्या प्रतिनिधीने बारामती वनपरिक्षेत्राचे अधिकारी लोणकर मॅडम यांना फोनद्वारे संपर्क साधला असता. संबंधित प्रकरणावर कारवाई सुरू आहे. तक्रारदारांना सोमवारी बोलविण्यात आले होते मात्र, मला अपिलांची सुनावणी असल्याने मी त्यांना मंगळवारी बोलविले आहे त्याठिकाणी काय कारवाई केली याबाबत त्यांना कळविणार आहे असे सांगितले. संबंधित झाडे तोड व कोळश्याची भट्टी लावण्यावर कोणती कारवाई केली याबाबत विचारले असता, गुन्हा दाखल केला आहे. कोणता गुन्हा तर याबाबत तुम्ही मंगळवारी तक्रारदार यांच्यासोबत या त्याठिकाणी कळेल असे सांगितले.

One thought on “वन हद्दीत झाडे तोडून कोळसा भट्‌ट्या : बारामती वन अधिकार्‍यांची बघ्याची भूमिका

  1. यातील गोडबंगाल काय ते ओळखा ?………..यांना तोच कोळसा कमी भावात घेतात व दुसरीकडे तो आहे त्या भावात विकतात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!