राजकीय लोकांनी लावली नागरीकांची थट्टा!

बारामती(प्रतिनिधी): महाराष्ट्रातील राजकारणाची दयनिय परिस्थिती पाहुन असे वाटते की, राजकारणापेक्षा –बरी अशी एक म्हण आहे. या म्हणीला लाजवेल असे कृत्य सत्तेत बसणार्‍या राजकीय मंडळींनी केलेले आहे.

ही मंडळी कोणाशीही इमाने-इतबारे राहुन काम करीत नाही किंवा कोणाशी जुळवून घेत नसल्याचे या अडीच वर्षाच्या काळात दिसून आले. ही राजकीय मंडळींनी कधीही नागरीक केंद्रबिंदू मानून काम केले नाही. तर ज्यामध्ये स्वत:चा स्वार्थ, पै-पाहुण्यांचा स्वार्थ असेल त्यामध्ये मग्न राहुन कामे केल्याचे सर्वसामान्य नागरीकांनी डोळ्याने पाहिले व ऐकले सुद्धा.

आज समाजात परिस्थिती पाहिली असता, सर्वत्र महागाईने गरळ ओकलेली दिसत आहे. सुशिक्षित बेरोजगार नोकर्‍यांपासून वंचित आहेत. शिक्षणाचे बाजारीकरण करून ठेवले आहे. खाजगीकरणाला प्रोत्साहन देवून आयते कोलीत हातात दिले. विकासाच्या नावाखाली सर्वसामान्य नागरीकांची दमछाक केली. मंत्रिमंडळ का स्थापन केले जाते त्याचे हक्क व अधिकार काय हेच ही राजकीय मंडळी विसरून गेलेली आहेत.

शासनाचा अधिकारी हा जनतेचा नोकर असतो, मात्र तो या राजकीय मंडळींचा नोकर होऊन बसलेला दिसत आहे. तो सांगेल त्याप्रमाणे वागत आहे, कारवाई करीत आहे. जनतेच्या कामासाठी त्याला वेळ नाही मात्र, मंत्री महोदयांनी फक्त इशारा केला तरी तो —पाय लावीत पळत जातो ही अवस्था शासकीय मंडळींची होऊन बसली आहे.

राज्यात एवढा गदारोळ होत असेल, एखाद दुसरी निष्ठावंत मंडळी पक्ष सोडून जात असतील तर ही वेगळी बाब आहे मात्र, झुंडीने मंत्र्यासह आमदार पक्षाकडे पाठ फिरवून जात असतील तर याला पक्षाची साथ म्हणावी की, राजकारण? हेच नागरीकांना कळेनासे झाले आहे.

नागरीक आपला नेता, आपला पुढारी म्हणून त्यास स्वच्छ कारभार करण्यासाठी प्रत्येक पाच वर्षाला त्यास बहुमताने निवडून देतो. या आमदार, खासदाराने तुमच्यासाठी काय केले? याचा जाब विचारण्याची वेळ आलेली आहे. देशाचा पंतप्रधानापासून ते गावच्या तलाठ्यापर्यंत सर्वच जनतेचे नोकर असताना आज काय परिस्थिती झालेली आहे. हेच या देशाचे मालक होऊन बसले आहेत.

जातीय तेढ नसताना जातीय तेढ निर्माण करून एखाद्या मुलभूत व गंभीर विषयावरील नागरीकांचे लक्ष विचलीत कसे होईल व आपली पोळी कशी भाजता येईल याचाच विचार करीत असतील तर त्यांना दिसेल तिथे जाब विचारण्याची गरज आहे.

संविधानामध्ये सर्वसामान्य नागरीकांना जे मुलभूत अधिकार दिलेले आहेत त्याचा तर ही राजकीय मंडळी सर्रासपणे भंग करताना दिसत आहेत. जसं की, नागरीकांना काहीच कळत नाही असे म्हणून त्यांची एकप्रकारे थट्टा केली जात आहे.

केंद्रात व राज्यात वेगवेगळी सरकार आहे. एकाने मारल्यासारखे करायचे आणि दुसर्‍याने रडल्यासारखे करायचे असे सुरू आहे. नागरीकांचे प्रश्र्न तसेच घोंगडं भिजत ठेवल्याप्रमाणे जैसे थे! याला काय म्हणायचे.

शिवसेना म्हणजे एक सामाजिक कार्याचे विश्र्वासू व्यासपिठ होते. त्याचे कालांतराने रूपांतर राजकीय पक्षामध्ये झाले आणि हा पक्ष सर्वसामान्य, कामगार व गोरगरीबांच्या गळ्यातील ताईत होऊन बसले होते. शिवसेना संघटनेत काम करणारे कार्यकर्ते, पदाधिकार्‍यांना निष्ठावंत कसा असावा याचे ज्वलंत उदाहरण इतर पक्ष देत होते. आज या पक्षातील निष्ठावंत जर पक्षाला रामराम ठोकत असतील तर शिवसेनेचा असलेला दरारा, एकनिष्ठता, लोकप्रियता लयाला गेली आहे. आज सर्वसामान्य नागरीकांमध्ये बोलले जावू लागले आहे की, घरका भेदी लंका ढाये! घरका भेदीला कोणी प्रोत्साहन दिले हाही खरा प्रश्र्न समोर येत आहे.

जेव्हापासुन राजकीय भूकंपाला सुरूवात झाली तेव्हापासून नागरीकांना चैन पडेना, चौका-चौकात, चावडी, वस्ती व गल्ली बोळातून आघाडीची बिघाडी तर होणार नाही ना? असेच वाक्य कानी पडत होते. सर्वसामान्य नागरीकांनी या मंडळींकडे लक्ष न देता आपला दैनंदिन जीवन व्यथित करावे. या गबरगंड राजकीय मंडळींनी महिना नव्हे तर वर्षभर जरी काय केले नाही तरी यांचे दैनंदिन उपजिवीकेत किंचीतही फरक पडणार नाही. मात्र, सर्वसामान्य नागरीकांनी काय करायचे, का? ही राजकीय मंडळी अशीच तुमची थट्टा करीत राहणार हे नकळणारे अंतिम सत्य आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!