कधीही वृत्तपत्र न काढणार्या पत्रकाराची साथ?
पोलीस सेवेत सतर्क असणार्या उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळेंमुळे लाखो रूपयांचा गुटखा जप्त
बारामती (वार्ताहर): गुटखा माफिया संतोष गायकवाड याच्यावर वेळोवेळी कारवाई करूनही पुन्हा गुटखा विक्री होत असेल तर याच्यावर मोकाअंतर्गत कारवाई करण्याची मागणी होत आहे.
पोलीस सेवेत सतर्क असणार्या उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळेंमुळे लाखो रूपयांचा गुटखा जप्त करण्यात बारामती शहर पोलीसांना यश आले आहे.
याबाबत हकीकत अशी की, दि.9 जून 2022 रोजी वसंतनगर येथून टी.सी. कॉलेजकडे जाणारे बाजूकडे साधारण 300 मिटरवर उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी गोपनीय बातमीच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक, सपोनि. श्री.पालवे, सपोनि. श्री.वाघमारे, पो.कॉ. श्री.चव्हाण, श्री.ठोंबरे, श्री.दळवी, श्री.कांबळे यांना सोबत घेऊन पायी चालत जात असताना मिशन हायस्कुलचे शेजारी रोडवर माहिती मिळाल्याप्रमाणे एक अशोक लेलंड टेम्पो (टेम्पो क्र एचएच-12 क्यूजी 8872) थांबलेला दिसला.
पोलीस स्टाफ त्याचे जवळ जाताच त्या टेम्पोमधून संतोष गायकवाड व एक अज्ञात इसम हे दोघेजण मिशन हायस्कुलचे तार कंपाऊंडवरुन उडी मारुन पळू लागल्याने पोलीस स्टाफने त्यांचा पाठलाग केला त्यावेळी आवाज देवूनही ते अंधाराचा फायदा घेवून तेथून पळून गेले. पोलिस स्टाफने मिळून आलेल्या अशोक लेंलड टेम्पोची पाहणी केली असता सर्व पिशव्यांमध्ये गुलाम नावाचा गुटखा एकूण 13 लाख 6 हजार 800 रुपयांचा माल त्यामध्ये 11 लाख 8 हजार 800 रुपयांचा गुलाम गुटखा आणि 2 लाख रुपयांचा अशोक लेलंड टेम्पो मिळून आला.
पोलीस नाईक यशवंत ज्ञानदेव पवार यांनी संतोष गायकवाड व एक अज्ञात इसम यांचे विरुद्ध दिलेल्या फिर्यादीवरून बारामती शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख, अपर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते, बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस स्टेशनच्या वरील अधिकारी व कर्मचार्यांनी केली आहे.
प्रशासन स्वयंघोषित पत्रकारांचे काय करणार….
कधीही वृत्तपत्र न काढता प्रशासनावर रूबाब करणार्या काही स्वयंघोषित पत्रकार, वार्ताहर, प्रतिनिधी अशा अवैध धंदे करणार्यांकडून चिरीमिरी घेऊन प्रेस लिहिलेले वाहन, स्वत:ची खोली देवून त्यांना संरक्षण देत असल्याचे बारामतीत चर्चेला उधान आले आहे. प्रशासनाने अशा स्वयंघोषित पत्रकारांच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत.
पत्रकार म्हणून प्रशासन करते दुर्लक्ष…
कोरोना काळात, लॉकडाऊन मध्ये दारू, गुटखा व्यसनी लोकांना लागणार्या वस्तु काही स्वयंघोषित पत्रकारांनी घरात, ऑफिसमध्ये ठेवून पाहिजे तशा पुरविल्या आहेत. उलट अशा गैरकृत्याकडे दुर्लक्ष न करता स्वयंघोषित पत्रकारांवर कारवाई करण्याची गरज आहे.