बारामतीचा मतदार विधानसभेला डिपॉझीट जप्त करतो, नगरपरिषदेत सुद्धा चमत्कार दाखविणार
बारामती(वार्ताहर): बारामती नगरपरिषदेच्या हद्दीतील विकास पाहता, येणार्या पंचवार्षिक निवडणूकीत विरोधकांना जागा दाखविण्याची खरी वेळ आली असल्याचे नागरीकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.
देशाचे भाग्यविधाते खा.शरदचंद्रजी पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार, बारामतीच्या लोकप्रिय खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नातून बारामतीचे रूपडं पालटलं आहे. न भूतो, न भविष्यतो असा बारामतीचा विकास झालेला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार हे रात्रीचा दिवस करीत प्रत्येक कामाची पाहणी करून बारामतीकरांनी केलेल्या प्रेमापोटी विकासाची गंगा बारामतीकरांच्या दारी आणली आहे.
एवढा विकास करूनही एका रात्रीत बारामतीकर विशेषत: मतदारांमध्ये बदल होत असेल तर केलेल्या विकासावर पाणी फेरल्यासारखे होईल. बारामतीच्या राजकारणात काही छोटे-मोठे पक्ष सोडले तर देशात व राज्यात पायेमूळे रोवलेला पक्ष मूग गिळून का? असेही नागरीकांमध्ये बोलले जात आहे. संबंधित पक्षाने येथील कार्यकर्त्यांची कार्यशाळा घेणे गरजेचे आहे.
बारामती नगरपरिषदेत विरोधक निवडून का येतात हा खरा प्रश्र्न आहे. एखादा खेळाडू त्याने अंगिकारल्या खेळात प्राविण्य मिळवतो. देशपातळीवर नाव कमवितो याचे कारण म्हणजे त्या खेळाबाबत मुलभूत सुविधा उपलब्ध असते. प्रशिक्षक असतात, प्रशिक्षक त्याच्या हालचालीवर नजर ठेवून असतात त्यामुळे तो कष्ट करून नावलौकीक मिळवतो. त्याने प्रश्र्न उपस्थित करेपर्यंत प्रश्र्नाचे उत्तर तयार ठेवतात.
असाच काहीसा प्रकार बारामती नगरपरिषदेत दिसून येतो. बारामती नगरपरिषदेचे प्रशासन विरोधकाने सांगितले की, प्रशासन पळताना दिसते. सत्ताधार्यांनी सांगितले की, चालढकल करून आजचे मरण उद्यावर असे करतात त्यामुळे नागरीकांमध्ये विरोधकांचा ठसा उमटला आहे. न होणारी कामे त्यांच्याकडून केली जातात. कसा अधिकारी पळाला असे म्हणून टाळीवर टाळी दिली जाते. दुसरे कारण म्हणजे सत्ताधारी उमेदवार देताना ज्याला स्वत:च्या घरात किंमत नाही असा उमेदवार देवून सहज समोरच्या विरोधकांना निवडून आणतात. त्या व्यक्तीची प्रतिमा काय, नागरीकांशी त्याचे संबंध कसे आहेत. नाहीतर फक्त त्याच्याकडे पैसा आहे म्हणून उमेदवारी देवून चालत नाही. मागील पंचवार्षिक निवडणूकीत तसा अनुभव सत्ताधार्यांनी घेतलेला आहे. तेच-ते उमेदवार, तेच ते कुटुंबातील व्यक्ती दिल्याने सुद्धा नागरीकांमध्ये नाराजी व्यक्त केली जाते. त्यामुळे नवा युवा चेहरा देणे गरजेचे आहे. सत्ताधारी निवडणूका आल्या की, सर्वांना संधी देवू सांगून मुलाखतीला स्विकृतचे अमिष दाखवून पाच वर्षे त्यास तपश्र्चर्या करण्यास भाग पाडतात. त्यामुळे सत्ताधार्यांकडे असणारे चांगले, निष्ठावंत चेहरे समोर येत नाही तर दुरावले जातात.
सत्ताधार्यांकडे अशी काही मंडळी आहेत की, पक्षाच्या माध्यमातून कोरोडो रूपये कमविले आहेत. संपूर्ण उमेदवारांचा एकावेळेस खर्च करतील. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवार त्याचा सर्व खर्च पेलण्यासाठी पक्षातील मंडळींनी पुढे आले पाहिजे. अन्यथा सत्ताधार्यांकडे स्वच्छ, निष्ठावंत असणारे कार्यकर्ते, पदाधिकारी फक्त झेंडा मिरविण्याच्या कामासाठी राहतील.
विधानसभेला हाच मतदार विरोधकाचे डिपॉझीट जप्त करत असेल तर बारामती नगरपरिषदेत डिपॉझीट जप्त केल्याशिवाय राहणार नाही असेही बोलले जात आहे.