बारामती(वार्ताहर): संत निरंकारी मिशन बारामती शाखेच्या वतीने शनिवारी (ता.11) सर्व रोग निदान मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याचे सातारा झोनचे प्रभारी नंदकुमार झांबरे यांनी सांगितले.
सदर शिबीर खंडोबा नगर येथील सत्संग भवनात सकाळी 9 ते 4 यावेळेत होणार आहे. या शिबिरासाठी डॉ. पुरूषोत्तम अरोरा (प्रसिद्ध ह्रदय विकार तज्ञ, बेंगलोर) यांच्यासह आठ ते दहा अनुभवी डॉक्टरांची टीम उपस्थित राहणार आहे.
हे शिबीर सर्वांसाठी असून या शिबिरामध्ये हृदय विकारासह इतर आजारांची मोफत तपासणी करून त्यावर मोफत औषध गोळ्या दिली जाणार आहेत. तपासणी साठी येताना जुने रिपोर्ट फाईल सोबत घेऊन यावे. या शिबिराचा बारामतीसह परिसरातील जास्तीत जास्त गरजूंनी लाभ घ्यावा असे आवाहनही श्री. झांबरे यांनी केले आहे.
सदर शिबीर यशस्वी पणे पार पाडण्यासाठी बारामती क्षेत्राचे क्षेत्रीय संचालक किशोर माने यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती शाखेचे मुखी आनंद महाडिक, संचालक शशिकांत सकट, सेवादल शिक्षक बाळासाहेब जानकर, महिला सहाय्यक शिक्षिका वर्षा चव्हाण यांच्यासह सेवादल, सेवादल भगिनी विशेष परिश्रम घेणार आहेत.