पूर्ववैमनस्यातून खूनाचा प्रयत्न करणार्‍या सुनिल माने व विनोद माने यांच्यावर गुन्हा दाखल

बारामती(वार्ताहर): येथे पूर्ववैमनस्यातून खूनाचा प्रयत्न करणार्‍या सुनिल संभाजी माने व विनोद शिवाजी माने यांच्यावर भा.द.वि.कलम 307 अन्वये बारामती शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.

जुन्या गाड्यांची खरेदी विक्री करणारा गणेश बलभीम धोत्रे (वय-27, रा.नायगावकर हॉस्पीटलमागे, नेवसे रोड, बारामती) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत सविस्तर माहिती अशी की, गणेश धोत्रे हा कै.कृष्णा जाधव यांचा साथीदार व त्यांच्या मटक्या अड्‌ड्यावर काम करत होता. कै.कृष्णा जाधव यांचा 2018 मध्ये खून झाला होता. या खूनाच्या गुन्ह्यात सुनील माने व विनोद माने होते. हे दोघो काही दिवसांपूर्वीच जामीनावर आलेले होते.

9 मे रोजी सायंकाळी गणेश धोत्रे यास सुनील माने याने मोबाईल फोन करून सातव चौक या ठिकाणी असणार्‍या पत्राशेड याठिकाणी येण्यास सांगितले. या दोघांची दहशत असल्यामुळे गणेश धोत्रे तात्काळ त्या ठिकाणी आला. त्याठिकाणी सुनील व विनोद माने पांढर्‍या रंगाच्या कारमधून त्या ठिकाणी आणखी दोन लोकांसह आलेले होते. सुनील माने हा बरोबर असणार्‍यांना म्हणाला की, गाडी विक्रीतून गणेशने खूप पैसे कमावले आहेत तसेच त्याचा मटक्याचा धंदा चालू आहे. त्यामुळे गणेशने दोन लाख रुपये द्यावेत. यावर गणेश म्हणाला की, सध्या परिस्थिती गरीबीची आहे, पैसे देऊ शकत नाही असे म्हणताच सुनील माने याने त्याच्या दिशेने तलवारीचा वार केला त्याने तो चुकवला. त्यानंतर विनोद माने यांनी त्याला काठीने मारहाण केली. सुनील माने याने त्याच्या नरड्यावर पाय दिला त्यानंतर आणखी दोन इसमांनी त्याला पकडले. त्यावेळेस त्याच्या खिशातून 13 हजार रुपये काढून घेतल्याचे त्याने फिर्यादीत सांगितले आहे. या सर्व घटनेतून गणेश धोत्रे हा अत्यंत भयभीत झालेला आहे.

या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ करीत आहेत. वरील दोन्ही आरोपींना तात्काळ गुन्हा दाखल झाल्यानंतर अटक करण्यात आलेली आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे व पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.

दोन्ही आरोपींना माननीय न्यायालयासमोर रिमांड साठी हजर करण्यात येणार आहे पुढील तपास सुरू आहे. शहरामध्ये कोणाही विरुद्ध जर दादागिरी किंवा दहशतीच्या तक्रारी असतील तर त्यांनी पोलीस ठाण्याशी संपर्क करावा मोठा गुन्हा होण्याअगोदर सदर लोकांच्यावर कारवाई केली जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!