बारामती(उमाका): कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे कृषी निविष्ठा विक्रेत्यांसाठी कृषी विस्तार पदविका अभ्यासक्रमाच्या चौथ्या तुकडीचा शुभारंभ उपविभागीय कृषि अधिकारी वैभव तांबे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी केंद्रप्रमुख डॉ. धीरज शिंदे ,विषय विशेषज्ञ डॉ. रतन जाधव, संतोष गोडसे, सुनील शिरशीकर व बारामती, इंदापूर, दौंड आणि पुरंदर येथील 40 कृषि निविष्ठा विक्रेते उपस्थित होते.
यावेळी श्री. तांबे म्हणाले, यापुढे औषध आणि खत दुकानाचा परवाना फक्त कृषि पदवीकाधारक, पदवीधारक किंवा पदवीसाठी रसायनशास्त्र विषय असणार्यांनाच मिळणार आहे. जुन्या दुकानदारांकडे कृषि पदवी किंवा पदविका नसेल तर त्यांनी राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापन संस्था, हैदराबाद किंवा वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था नागपूर येथे एक वर्षाचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण करावा. दुकानदारांनी त्यांचे परवाने संपण्याच्या एक महिना अगोदर नूतनीकरणासाठी पाठवावे.
कृषि निविष्ठा विक्रेत्यांनी प्रत्येक महिन्याला खते, औषधे, बियाणेबाबतचा अहवाल जिल्हा अधीक्षकांना पाठवावा. कीटकनाशके, खते आणि औषधे यांचा कृषि विद्यापीठाच्या शिफारशीनुसार वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
केंद्रप्रमुख डॉ. शिंदे म्हणाले, या कृषी विस्तार पदविकेमुळे फवारणी वेळी योग्य काळजी कशी घ्यावी,औषधाचे प्रमाण किती वापरावे इत्यादी माहिती मिळेल. कृषि दुकानदारांनी याचा लाभ घेऊन शेतकर्यांना योग्य मार्गदर्शन करावे.
डॉ. रतन जाधव म्हणाले, या पदविका अभ्यासक्रमामूळे दुकानदारांना पिकांची शास्त्रीय माहिती, खते, औषधांचा वापर, नवीन संशोधन इत्यादी माहिती मिळणार आहे. शेतकर्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी या अभ्यासक्रमाचा उपयोग करावा. श्री गोडसे यांनी एक वर्षाच्या अभ्यासक्रमाचे सादरीकरण केले.